
इस्लामाबाद , 31 मे (हिं.स.)।पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मोठ्या भागात सध्या तीव्र उष्णतेची लाट कायम आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी दादू येथे तब्बल 51.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, जी शहराच्या इतिहासातील सर्वाधिक तापमानाची नोंद ठरली आहे.
पाकिस्तान हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, दादूमधील यापूर्वीचे सर्वोच्च तापमान 18 मे 2016 रोजी 51.4 अंश सेल्सियस नोंदवले गेले होते. हवामानतज्ज्ञ सरफराज खान यांनी सांगितले की, शनिवारी दुपारपर्यंत जेकबाबाद येथेही 51 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तसेच शहीद बेनझीराबाद (नवाबशाह), लरकाना आणि मोहेनजोदडो या ठिकाणी पारा 50 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला.
सरफराज खान म्हणाले, “दादूमध्ये 51.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, हा शहरासाठी नवा उच्चांक आहे.” मात्र, सिंध प्रांतासाठी इतके उच्च तापमान नवीन नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, सिंधमध्ये यापूर्वीही याहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. 2024 मध्ये प्राचीन मोहेनजोदडोचे अवशेष परिसरात तापमान तब्बल 53 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode