
अमरावती, 31 मे (हिं.स.) | शहराच्या क्रीडा विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला असून आमदार रवी राणा यांच्या विशेष प्रयत्नांतून अमरावती येथे तब्बल २० कोटी रुपयांच्या निधीतून ऑलिम्पिक स्तरावरील सायकल ट्रॅक व अत्याधुनिक स्टेडियमची निर्मिती करण्यात येणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दर्शविली असून, त्यामुळे अमरावती शहराच्या क्रीडाक्षेत्राला नवी ओळख मिळणार आहे. अमरावती शहरातील युवक-युवतींमध्ये खेळासंदर्भात मोठ्या प्रमाणात उत्साह असून, गुणवंत खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रवी राणा यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.
या प्रकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचा सायकल ट्रॅक, खेळाडूंसाठी आधुनिक सुविधा, प्रेक्षक गॅलरी, प्रशिक्षण केंद्र, रनिंग ट्रॅक तसेच विविध क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी मोठी संधी निर्माण होणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत मंजुरी दिल्याबद्दल आमदार रवी राणा यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी