
सोलापूर, 31 मे, (हिं.स.) आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. इंधन पंपांवर ग्राहकांना कमी प्रमाणात इंधन देणे, अनधिकृत साठवणूक करणे आणि चढ्या दराने विक्री करणे यासारख्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त भरारी पथके स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंपांवर पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी मोठ्या रांगा लागत असल्याने काळाबाजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच काही पंपांवर प्रति लिटर इंधनात काटामारी करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय संयुक्त भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील ही पथके पेट्रोलपंप, इंधन साठवणूक केंद्रे आणि संशयित ठिकाणी अचानक तपासणी करून गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.
विनापरवाना पेट्रोलियम पदार्थांचा साठा करून चढ्या दराने विक्री करणाऱ्यांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आवश्यक असलेल्या डिझेलचा तुटवडा भासू नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित पेट्रोलपंपांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, शेतकरी ड्रममधून डिझेल घेऊन जात असतील तर त्यांची सातबारा उताऱ्याची माहिती, गावाचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक यांची नोंद पंपावरील रजिस्टरमध्ये ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या उपाययोजनांमुळे इंधनाचा काळाबाजार रोखण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी व्यक्त केला
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड