
म्युनिक, 31 मे (हिं.स.)भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सम्राट राणा यांनी आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावले. अंतिम सामन्यात, ही भारतीय जोडी चीनचे विद्यमान विश्वविजेते याओ कियानशुन आणि हू काई यांच्याकडून अत्यंत चुरशीच्या लढतीत केवळ ०.३ गुणांनी पराभूत झाली. या रौप्यपदकासह भारताने दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. चीनने चार सुवर्ण आणि तीन कांस्य पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवले.
अंतिम सामन्याची सुरुवात भारतीय जोडीसाठी संथ झाली. पहिल्या पाच-शॉटच्या मालिकेनंतर, भारत १००.० गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. सम्राटने ५१.० आणि मनूने ४९.० गुण मिळवले. दुसऱ्या मालिकेत, मनूने जोरदार पुनरागमन करत ५१.५ गुण मिळवले, तर सम्राटने ४९.९ गुण मिळवले. यामुळे भारतीय जोडीला दुसरे स्थान मिळविण्यात मदत झाली. तिसऱ्या सीरिजनंतर भारताने चीनसोबतचे अंतर केवळ ०.१ गुणांपर्यंत कमी केले. मनूने शानदार ५१.८ गुण मिळवले आणि सम्राटने ५०.७ गुण मिळवले. पहिल्या एलिमिनेशन सीरिजनंतर भारतीय जोडीने २.२ गुणांची आघाडी घेतली होती. मनूने ३०.९ आणि सम्राटने ३०.५ गुण मिळवले, तर चिनी जोडी दबावाखाली दिसत होती.
पुढच्या फेरीत सम्राटच्या ३१.२ गुणांनंतरही, मनूच्या काही कमकुवत शॉट्समुळे चीनने पुनरागमन केले. २१ व्या शॉट नंतर भारताची २.२ गुणांची आघाडी संपुष्टात आली आणि चिनी जोडी ०.२ गुणांनी पुढे राहिली. अंतिम सीरिजमध्ये मनूने शानदार १०.६ गुण मिळवले, पण सम्राटला केवळ ८.८ गुणच मिळवता आले. त्यानंतर चीनने आपली आघाडी कायम ठेवली, ज्यामुळे भारतीय जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. चीनच्या दुसऱ्या जोडीने, शेन यिहाओ आणि बू शुआईहांग यांनी कांस्य पदक जिंकले. भारताची दुसरी जोडी, सुरुची सिंग आणि श्रावण कुमार, पात्रता फेरीत ५७५-२०x गुणांसह १०व्या स्थानावर राहिली. सुरुचीने २९१-११x, तर श्रावणने २८४-९x गुण मिळवले.
१० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात भारतीय जोड्या पदक फेरीसाठी पात्र ठरू शकल्या नाहीत. एलावेनिल वलारिवन आणि अर्जुन बाबुटा यांची जोडी ६३०.० गुणांसह १४व्या स्थानावर राहिली. आर्या बोरसे आणि शाहू तुषार माने यांची जोडी ६२९.६ गुणांसह १६व्या स्थानावर राहिली. चीनच्या वांग जिफेई आणि शेंग लिहाओ यांनी सुवर्णपदक जिंकले. नॉर्वेच्या जेनेट हेग ड्युस्टॅड आणि जॉन-हर्मन हेग यांनी रौप्यपदक पटकावले, तर चीनच्या हान जियायू आणि मा सिहान यांनी कांस्यपदक पटकावले.
भारताने आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत एकूण चार पदके (दोन सुवर्ण आणि दोन रौप्य) जिंकून आपली प्रभावी उपस्थिती दर्शवली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मनू भाकर आणि सम्राट राणा यांनी मिळवलेले रौप्य पदक भारतीय पथकासाठी एक मोठे यश ठरले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे