
रावळपिंडी, 31 मे (हिं.स.)पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला पाच गडी राखून पराभूत करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. २१ वर्षीय फिरकी गोलंदाज अराफत मिन्हासने पाच बळी घेत आपले एकदिवसीय पदार्पण संस्मरणीय केले आणि पाकिस्तानला विजय मिळवून दिला. हा सामना पाकिस्तानचा १००० वा एकदिवसीय सामनाही होता. यासह, भारत (१०७५) आणि ऑस्ट्रेलिया (१०२०) यांच्यानंतर १००० एकदिवसीय सामने खेळणारा पाकिस्तान हा जगातील तिसरा देश ठरला आहे.
डावखुरा फिरकी गोलंदाज अराफत मिन्हासने ३२ धावांत पाच बळी घेत, एकदिवसीय पदार्पणात पाच बळी घेणारा पहिला पाकिस्तानी गोलंदाज होण्याचा मान मिळवला. फिरकी गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधीच दिली नाही. मिन्हासला अबरार अहमद (२/४४) आणि सलमान अली आगा (१/२१) यांचीही चांगली साथ मिळाली. त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ ४४.१ षटकांत २०० धावांवर सर्वबाद झाला. सामन्यानंतर मिन्हास म्हणाला, दबाव होता, पण मला अशा वातावरणाचा आनंद घ्यायला आवडतो. या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यावर माझे संपूर्ण लक्ष होते.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. मिन्हासने कर्णधार जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन आणि कॅमेरॉन ग्रीन यांना लवकर बाद करून ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले. एका क्षणी, १६ व्या षटकात संघाने ६८ धावांत चार गडी गमावले होते. सलामीवीर मॅथ्यू शॉर्टने ५५ धावा केल्या, तर मॅथ्यू रेनशॉ ६१ धावांसह संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. पण, कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही आणि संघ २०० धावांवर सर्वबाद झाला.
२०१५ नंतर प्रथमच एकदिवसीय संघात परतलेल्या बाबर आझमने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला. त्याने ९४ चेंडूंमध्ये ६९ धावा करून आपले ३८ वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. यष्टीरक्षक-फलंदाज गाझी घोरीनेही शानदार फलंदाजी करत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक, ६५ धावा केल्या. या दोन फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी १२७ धावा जोडून पाकिस्तानला मजबूत स्थितीत आणले. नॅथन एलिसने बाबर आणि घोरी या दोघांनाही बाद केले, पण तोपर्यंत पाकिस्तान विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता.
अराफत मिन्हासने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही योगदान दिले. त्याने १७ चेंडूंमध्ये नाबाद १८ धावा केल्या आणि मार्नस लॅबुशेनच्या गोलंदाजीवर सरळ षटकार मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने ४२.३ षटकांत पाच गडी गमावून २०२ धावा करत सामना जिंकला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे