परभणीत दुर्लक्षपणामुळे प्रशासकीय इमारत बेवारस : संपूर्ण परिसरात प्रचंड गैरप्रकार
परभणी, 04 मे (हिं.स.)। येथील प्रशासकीय इमारत जिल्हा महसूल प्रशासनाने सातत्याने सुरु केलेल्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे अक्षरशः बेवारस बनली आहे. या इमारतीसह परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर खूलेआमपणे दिवसाढवळ्यासुध्दा गैरप्रकार सुरु आहे
परभणीत दुर्लक्षपणामुळे प्रशासकीय इमारत बेवारस : संपूर्ण परिसरात प्रचंड गैरप्रकार


परभणी, 04 मे (हिं.स.)।

येथील प्रशासकीय इमारत जिल्हा महसूल प्रशासनाने सातत्याने सुरु केलेल्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे अक्षरशः बेवारस बनली आहे. या इमारतीसह परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर खूलेआमपणे दिवसाढवळ्यासुध्दा गैरप्रकार सुरु आहेत. तसेच छोट्या-मोठ्या चोर्या नित्याच्या झाल्या आहेत. यामुळे या इमारती अंतर्गत शाासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी अक्षरशः हतबल झाले आहेत.

येथील प्रशासकीय इमारत गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. अतिरिक्त जिल्हाधिकार्यांच्या नियंत्रणाखाली या इमारतीत अनेक शासकीय-निमशासकीय कार्यालये व न्यायालयसुध्दा तात्पुरत्या स्वरुपात कार्यान्वित असतांनासुध्दा या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसह संरक्षणाकडे वरिष्ठ अधिकारी ढुंकूनही पाहत नाहीत, हे विदारक चित्र आहे. त्याचा परिणाम या इमारतीच्या परिसरात बेसुमार अतिक्रमणे झाली आहेत. चहाच्या टपर्या, पान टपर्या, हॉटेल्स, झेरॉक्स सेंटर्स तसेच अन्य विक्रेत्यांनी अतिक्रमणे करीत पक्की बांधकामे सुध्दा केली आहेत. या अतिक्रमणकर्त्यांच्या विरोधात महसूल प्रशासनाने कधीही काडीचीही कारवाई केली नाही. त्याचा परिणाम संपूर्ण इमारतीस या अतिक्रमणकर्त्यांनी अक्षरशः घेरले आहे.

अतिक्रमणकर्त्यांच्या दररोजच्या त्रासापाठोपाठ या इमारतीसह परिसरात दररोज रात्री तळीरामांचा मोठा धूमाकुळ आहे. तरुणाईचे लोेंढेच्या लोंढे दारुच्या बॉटल्स घेऊन सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत या इमारतीत, परिसरात ठाण मांडून पार्ट्या झोडू लागले आहेत. इमारत परिसरात, इमारतीतसुध्दा बाटल्यांचा ढिगार साचला आहे. गुटख्याच्या पुड्या, इमारतीवर ठिकठिकाणी गुटख्याच्या पिचकार्या तसेच काना कोपर्यामध्ये लघुशंका, दुर्गंधी असे भिषण चित्र सर्वदूर आहे.

मध्यंतरी या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली तथाकथित कंत्राटदारांनी संरक्षण भिंतीसह इमारतीचे काम केले. ते कामसुध्दा अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे इमारतीच्या दरवाजांसह खिडक्या, भिंतीचे प्लास्टर अक्षरशः तकलादू झाले आहे. इमारतीच्या छताचे प्लास्टर कधी कोसळेल याची शाश्वती नाही. त्यातच या इमारती अंतर्गत अस्वच्छतेचा प्रकार अक्षरशः किळसवाना आहे. काना कोपर्यासह भिंतींवर मोठ्या प्रमाणावर धूळ व जाळे पसरले आहे. संपूर्ण परिसरातसुध्दा मोठ्या प्रमाणावर गवत, केरकचरा, तसेच डागडुजीच्या कामाचा पसारा पडलेला आहे. या इमारतीत स्वछतेबाबत अक्षरशः बोंबाबोंब आहे.

इमारतीच्या परिसरात पार्कींगचे तर तीन-तेरा वाजले आहेत. मूळात पार्कींगला अतिक्रमणांमुळे जागाच शिल्लक नाही. वाहनधारक थेट इमारतीच्या प्रवेशद्वारावर तर काही महाभाग थेट इमारतीतसुध्दा वाहने उभी करीत आहेत. या इमारतीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने इमारत बेवारस अवस्थेत उभी आहे.

प्रशासकीय इमारती अंतर्गत शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी या अनागोदीने अक्षरशः हतबल झाले आहेत. तळीरामाच्या उच्छादासह भूरट्या चोर्यांमुळेही सर्व कार्यालये त्रस्तावले आहेत. खिडकीतून, दरवाजाची तोडफोड करीत वस्तू पळविणे नित्याचीच बाब आहे. येथील जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील वीज प्रवाहच अज्ञात चोरट्यांनी वायरची चोरी करीत खंडीत केला. गेल्या चोवीस तासांपासून येथील कर्मचारी विजेवीना अक्षरशः बेचैन होऊन अंधारात काम करत बसले होते. याच पध्दतीने अन्य कार्यालयांचेसुध्दा एक एक अनुभव, किस्से अक्षरशः विदारक आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande