लातूरमध्ये पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा; जनजीवन व शेतीवर परिणाम
लातूर, 04 मे (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून शेती व वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक पेट्रोल पंपांवर ‘स्टॉक नाही’ असे फलक लावण्यात आले असून क
पेट्रोल  टंचाई


लातूर, 04 मे (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून शेती व वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक पेट्रोल पंपांवर ‘स्टॉक नाही’ असे फलक लावण्यात आले असून काही पंप पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत.

रविवार सायंकाळपासूनच परिस्थिती अधिक गंभीर झाली. शहरातील पाच नंबर चौक, एक नंबर चौक, रिंगरोड तसेच जेएसपीएम शिक्षण संस्थेजवळील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याने सेवा बंद करण्यात आली. सोमवारी (४ मे) सकाळीही अनेक पंप बंद असल्याचे चित्र दिसून आले.

ज्या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध होते, तेथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही पंपांवर तर फक्त २०० रुपयांपर्यंतच पेट्रोल देण्याची मर्यादा घालण्यात आली होती. यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

डिझेलच्या तुटवड्यामुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक दोन्हीवर परिणाम झाला आहे. विशेषतः ग्रामीण भागात शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीच्या वापरात अडथळे निर्माण झाले असून शेतमाल वाहतुकीत अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

इंधनटंचाईमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, बाहेरगावी जाणाऱ्या वाहनधारकांसमोर प्रवासाचे मोठे प्रश्न उभे राहिले आहेत.

------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande