
नाशिक, 04 मे (हिं.स.) : नाशिक शहर परिसरात प्रस्तावित परिक्रमा मार्गामुळे बाधित होणाऱ्या दरी, मातोरी, मुंगसरे आणि गोवर्धन परिसरातील शेतकऱ्यांशी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात संवाद साधला. या वेळी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना शासनाकडून योग्य न्याय मिळेल, असे आश्वासन देण्यात आले.
या बैठकीस आमदार हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आडके-आहेर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, परिक्रमा मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई दिली जाईल. शासन आणि जिल्हा प्रशासन या प्रकरणी संवेदनशील असून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, ते लवकरच संबंधित गावांना भेट देणार असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून मार्ग काढला जाईल. मोजणीदरम्यान काही अनुचित प्रकार घडला असल्यास त्याची चौकशी करून आवश्यक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. तसेच महिला शेतकऱ्यांच्या तक्रारी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्याकडे नोंदवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी आमदार हिरामण खोसकर यांनीही विविध सूचना मांडल्या. शेतकऱ्यांनी आपापल्या समस्या आणि मागण्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
-------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV