
रायगड, 04 मे (हिं.स.) : नवी मुंबई परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी सिडकोकडून महत्त्वाकांक्षी ‘एड्युसिटी’ प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल तालुक्यातील करंजाडे येथे सुमारे १०० हेक्टर जागेवर हा प्रकल्प साकारला जाणार असून, प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ देशातील पहिली एकात्मिक शिक्षणनगरी उभी राहणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या नामांकित परदेशी विद्यापीठांना एकाच ठिकाणी आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात न जाता तुलनेने कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
एड्युसिटीमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस, अत्याधुनिक संशोधन केंद्रे, इनोव्हेशन हब, विद्यार्थ्यांसाठी आधुनिक निवास व्यवस्था तसेच उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. हा प्रकल्प व्यापक विकास आराखड्याचा भाग असून, मेडिसिटी आणि एरोसिटीसारख्या विशेष क्षेत्रांचाही त्यात समावेश असणार आहे.
करंजाडे येथील निवडलेली जागा प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ असून, प्रमुख महामार्ग आणि वाहतूक मार्गांशी उत्तम प्रकारे जोडलेली आहे. सपाट भूभाग आणि विकासासाठी अनुकूल परिस्थितीमुळे या परिसराची निवड करण्यात आली आहे.
सध्या प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, भू-सपाटीकरण आणि प्राथमिक विकासकामांना सुरुवात झाली आहे. अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे.
या एड्युसिटीमध्ये विमानन, लॉजिस्टिक्स, तंत्रज्ञान, आरोग्य सेवा आणि डिझाइन यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांशी संबंधित अभ्यासक्रम सुरू होण्याची शक्यता आहे. अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी या प्रकल्पात सहभागासाठी रस दर्शवला असून, काहींसोबत करार प्रक्रिया प्रगत टप्प्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकल्पामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. गृहनिर्माण, वाहतूक, किरकोळ व्यवसाय आणि सेवा क्षेत्रालाही यामुळे चालना मिळणार असून, भविष्यात नवी मुंबईची ओळख आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्र म्हणून निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)