छत्रपती संभाजीनगर : आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश
छत्रपती संभाजीनगर, ०४ मे (हिं.स.) : आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी विशेष प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील अनुसू
छत्रपती संभाजीनगर : आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश


छत्रपती संभाजीनगर, ०४ मे (हिं.स.) : आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी विशेष प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या (एसटी) मुला-मुलींना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

या योजनेत आदिवासी विद्यार्थी तसेच विधवा, घटस्फोटित, निराधार आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पालकांच्या पाल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च आदिवासी विकास विभागामार्फत केला जाणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी दिली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असणे आवश्यक असून पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असावे. तसेच पालक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नसावेत, अशी अटही ठेवण्यात आली आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईज फोटो, जन्मतारखेचा पुरावा, वैद्यकीय प्रमाणपत्र, पालकांचे संमतीपत्र आणि दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र (लागू असल्यास) यांचा समावेश आहे.

अर्ज आदिवासी प्रकल्प कार्यालयातून मोफत उपलब्ध असून इच्छुक पालकांनी परिपूर्ण भरलेले अर्ज २५ मेपर्यंत प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, रिलायन्स मॉलच्या पाठीमागे, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande