
अमरावती, 05 मे (हिं.स.) | मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ९१८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेशाची मुदत वाढवून ती आता आठ मे करण्यात आल्याने पालकांना प्रवेशासाठी आणखी वेळ मिळणार आहे. विशेष म्हणजे, यंदाही बहुतांश पालकांचा ओढा नामांकित शाळांकडेच असल्याने प्रवेशप्रक्रिया काहीशी संथगतीने होत आहे.
आरटीई अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील २२७ शाळा या प्रवेशप्रक्रियेकरिता पात्र ठरल्या. २६२६ जागांसाठी तब्बल सात हजार ९०० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे यंदा स्पर्धा वाढली होती. २५८६ विद्यार्थ्यांना सोडतीद्वारे प्रवेशाची संधी मिळाली असून तेवढीच प्रतीक्षायादी तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी संगीता सोनोने यांनी सांगितले. आणखी चार दिवसांत प्रवेशाची संख्या वाढण्याची शक्यता शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
आतापर्यंत जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून प्रवेशाची मुदत आठ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. शाळांना प्रवेशासाठी १० मे पर्यंतची मुदत देण्यात आली असून त्यानंतर प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया घेतली जाईल. -संगीता सोनोने, शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग, जि. प.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी