
नंदुरबार, ०५ मे (हिं.स.) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार आणि तळोदा अंतर्गत येणाऱ्या सहा तालुक्यातील अनुसूचित जमाती (ST) विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
या योजनेअंतर्गत नंदुरबार प्रकल्पातील नंदुरबार, नवापूर व शहादा तसेच तळोदा प्रकल्पातील धडगाव, अक्कलकुवा व तळोदा या तालुक्यांतील विद्यार्थी पात्र ठरणार आहेत.
प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ३१ डिसेंबर २०२६ रोजी ६ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून जन्मतारीख १५ डिसेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान असावी. तसेच पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असणे अनिवार्य आहे.
अर्जांचे मोफत वाटप नंदुरबार प्रकल्प कार्यालयात २७ एप्रिल २०२६ पासून, तर तळोदा प्रकल्प कार्यालयात ४ मे २०२६ पासून सुरू झाले आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० मे २०२६ सायंकाळी ६ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
अर्जासोबत जातीचा दाखला, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला (२०२५-२६), वैद्यकीय प्रमाणपत्र, आधार कार्ड (विद्यार्थी व पालक), पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, जन्मतारखेचा ऑनलाइन दाखला आदी कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. तसेच विशेष परिस्थिती (अनाथ, अपंग, विधवा, घटस्फोटीत इ.) असल्यास संबंधित प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असलेल्या पालकांच्या पाल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे प्रकल्प अधिकारी अनय नावंदर (तळोदा) आणि डॉ. चंद्रकांत पवार (नंदुरबार) यांनी स्पष्ट केले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर