रत्नागिरी : मार्गताम्हाने येथील ॲट्रोसिटी प्रकरणात ३५ आरोपी निर्दोष
रत्नागिरी, 06 मे (संगमेश्वर तालुक्यातील मौजे मार्गताम्हाने येथे २०१३ साली पद्मावती देवीच्या पालखीवरून मराठा समाज आणि चर्मकार समाज यांच्यात निर्माण झालेल्या वादातून दाखल करण्यात आलेल्या ॲट्रोसिटी प्रकरणात चिपळूण येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ३५ आर
रत्नागिरी : मार्गताम्हाने येथील ॲट्रोसिटी प्रकरणात ३५ आरोपी निर्दोष


रत्नागिरी, 06 मे (संगमेश्वर तालुक्यातील मौजे मार्गताम्हाने येथे २०१३ साली पद्मावती देवीच्या पालखीवरून मराठा समाज आणि चर्मकार समाज यांच्यात निर्माण झालेल्या वादातून दाखल करण्यात आलेल्या ॲट्रोसिटी प्रकरणात चिपळूण येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ३५ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात दि. २३ मार्च २०१३ रोजी मार्गताम्हाने ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात मराठा बांधव आणि चर्मकार बांधव यांच्यातील वाद मिटवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस डीवायएसपी, चिपळूण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार आणि प्रांत अधिकारी उपस्थित होते. बैठकीत वाद मिटवण्यात आला होता तसेच गावात पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

सरकारी पक्षातर्फे न्यायालयात एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. मात्र साक्षीदारांच्या जबाबांमधील विसंगती आणि उलटतपासणीतील बाबींचा विचार करून आरोपींविरुद्धचा गुन्हा सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.आरोपींच्या वतीने चिपळूण येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. नितीन केळकर यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. सोहम भोजने आणि ॲड. अनिश केळकर यांनी सहकार्य केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande