रत्नागिरी : पर्यटकांना मारहाण करणाऱ्या चौघांना ४८ तासांत अटक
रत्नागिरी, 06 मे (हिं.स.) । आरे-वारे (ता. रत्नागिरी) समुद्रकिनाऱ्याजवळ पर्यटकांना मारहाण करून दहशत माजवणाऱ्या चार संशयित आरोपींना पोलिसांनी ४८ तासांत पनवेल येथून ताब्यात घेतले आहे. गेल्या २ मे रोजी मुंबईतील दहिसर येथून काही पर्यटक रत्नागिरीच्या नि
रत्नागिरी पोलिसांनी पनवेल येथे ताब्यात घेतलेले आरोपी


रत्नागिरी, 06 मे (हिं.स.) । आरे-वारे (ता. रत्नागिरी) समुद्रकिनाऱ्याजवळ पर्यटकांना मारहाण करून दहशत माजवणाऱ्या चार संशयित आरोपींना पोलिसांनी ४८ तासांत पनवेल येथून ताब्यात घेतले आहे.

गेल्या २ मे रोजी मुंबईतील दहिसर येथून काही पर्यटक रत्नागिरीच्या निसर्गरम्य आरे समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. सायंकाळी आरे किनाऱ्याजवळील रस्त्यावर या पर्यटकांना चार अनोळखी तरुणांनी किरकोळ कारणावरून पर्यटकांसोबत हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर पुढे मारहाण आणि दमदाटीमध्ये झाले. पर्यटकांना भररस्त्यात धमकावण्यात आल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित पर्यटकांनी तत्काळ रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

रत्नागिरी हा शांत आणि सुरक्षित पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. पर्यटकांच्या सुरक्षेला बाधा पोहचवणारी ही घटना पोलीस प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचे कडक आदेश दिले. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तातडीने रवाना करण्यात आले.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक अभय तेली आणि पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य पवार यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर केला. आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवत असतानाच ते रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी तातडीने पनवेल गाठले आणि सापळा रचून चारही आरोपींना त्यांच्या अड्ड्यावरून शिताफीने ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यापासून अवघ्या ४८ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

पर्यटकांवर अशा प्रकारे होणारे हल्ले जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायावर आणि प्रतिमेवर नकारात्मक परिणाम करू शकतात. मात्र रत्नागिरी पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संदेश संपूर्ण राज्यात गेला आहे. ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून रत्नागिरी पोलीस सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत, याचा प्रत्यय पुन्हा एकदा या कारवाईतून आला आहे.पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे पर्यटकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande