
धाराशिव, 06 मे (हिं.स.)।
देशातील युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा आणि उद्योगविश्वाशी त्यांचा संपर्क वाढावा यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री इंटरशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू केला आहे.या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना देशातील आघाडीच्या कंपन्या व आस्थापनांमध्ये ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिपची संधी उपलब्ध होणार आहे.
या योजनेचे विशेष आकर्षण म्हणजे उमेदवारांना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार असून, इंटरशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर ६ हजार रुपये एकरकमी अनुदानही प्रदान केले जाईल. याशिवाय प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला भारत सरकारतर्फे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा संरक्षण देण्यात येणार आहे.इच्छुक उमेदवारांनी www.pmintership.mca.gov.in या संकेतस्थळावर जाऊन प्रथम नोंदणी करून आपला प्रोफाईल तयार करावा.त्यानंतर विविध क्षेत्रांतील उपलब्ध इंटरशिपसाठी अर्ज करता येणार आहे.
या योजनेसाठी पात्रतेच्या अटी निश्चित करण्यात आल्या असून, उमेदवार किमान १० वी,१२ वी, पॉलिटेक्निक,डिप्लोमा किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच वय १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे.उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी सेवेत नसावा.यापूर्वी संबंधित उमेदवाराने कोणतीही इंटरशिप,अॅप्रेंटिसशिप किंवा कौशल्य प्रशिक्षण घेतलेले नसावे,ही अटही लागू आहे.
योजनेच्या माध्यमातून युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार असून, ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीत त्यांची कौशल्यवृद्धी होणार आहे.तसेच यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि दिलेल्या संकेतस्थळावरून आपली इच्छुकता नोंदवावी,असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, धाराशिव यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (०२४७२)-२९९४३४ वर संपर्क साधावा,असे कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis