रत्नागिरी : दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून फसवणूक, आरोपीला ५ वर्षे शिक्षा
रत्नागिरी, 06 मे (हिं.स.) । गुंतवणुकदारांना सहा महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ३४ लाख ३५ हजारांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ५ वर्षे सश्रम करावास व १ लाख ५५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. योगेश गणपत चव्हाण (रा. नवी मुंबई) अ
रत्नागिरी : दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून फसवणूक, आरोपीला ५ वर्षे शिक्षा


रत्नागिरी, 06 मे (हिं.स.) । गुंतवणुकदारांना सहा महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ३४ लाख ३५ हजारांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ५ वर्षे सश्रम करावास व १ लाख ५५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

योगेश गणपत चव्हाण (रा. नवी मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. सन २०१० मध्ये हा गुन्हा घडला होता. १५ वर्षांनंतर आता या गुन्ह्याप्रकरणी आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बेकायदेशीररीत्या कंपनी स्थापन करणे, लोकांची फसवणूक करणे, कोणताही परवानगी न घेता सावकारी व्यवसाय करणे असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले होते.

रत्नागिरी सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकार पक्षाकडून ॲड. प्रफुल्ल साळवी यांनी युक्तिवाद केला. खटल्यातील माहितीनुसार आरोपी योगेश चव्हाण याने २ फेब्रुवारी ते १० मे २०१० या कालावधीत 'ड्रीम नॅचरल लँड डेव्हलपर्स' या नावाची कंपनी स्थापन करून गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले. ही कंपनी बंद पडल्यावर गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी आरोपींनी 'स्वरा एंटरप्रायझेस' या नावाने बेकायदेशीररीत्या कंपनी सुरू केली. ही कंपनी कायद्याप्रमाणे नोंदणीकृत केली नाही. तसेच भारतीय रिझर्व्ह बँक आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांची परवानगी न न घेता ही कंपनी सुरू केली होती.

कंपनीच्या माध्यमातून आरोपीने गुंतवणूकदारांना ४ ते ६ महिन्यांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एकूण ३४ लाख ३५ हजार रुपये गोळा केले, परंतु ते परत केले नाहीत. तसेच त्याने परवाना नसताना सावकारी व्यवसाय केला. तसेच पैसे परत न करता गुंतवणूकदारांची फसवणूक विश्वासघात केला, असा आरोप योगेश याच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रभाकर कदम यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपीला ६ जुलै २०१० रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. बराच काळ त्याने न्यायालयात हजेरी न लावल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते.

शेवटी दुसऱ्या जिल्ह्यातील गुन्ह्यात अटक झाल्यावर न्यायालयाने काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटवरून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. या खटल्यादरम्यान एकूण ३० साक्षीदार सरकार पक्षाकडून तपासण्यात आले. त्यातून गुन्हा शाबीत झाल्याने आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande