बारावी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
छत्रपती संभाजीनगर, 06 मे (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक
बारावी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू


छत्रपती संभाजीनगर, 06 मे (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष वाया न घालवता पुढील वाटचाल करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

राज्य मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला.

अर्ज भरण्याची नियमित मुदत ५ ते १५ मे दरम्यान असून, विलंब शुल्कासह १६ ते २० मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्काची रक्कम २१ मेपर्यंत भरायची आहे, तर विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रीलिस्ट २५ मेपर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत नियमित किंवा विलंब शुल्काच्या मुदतीत वाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अतिविलंब शुल्काच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.

या परीक्षेसाठी अर्ज राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहेत. नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणारे विद्यार्थी यांना ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. याशिवाय आयटीआय विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला. फेब्रुवारी-मार्च परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेतील माहिती थेट ऑनलाइन अर्जामध्ये उपलब्ध होणार असल्याने अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ आणि जून-जुलै २०२७ अशा सलग तीन संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande