हिमंता बिस्वा सरमा यांचा राजीनामा; नव्या सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू
गुवाहाटी, ६ मे (हिं.स.) : विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी लोक भवन येथे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. यानंतर राज्यात न
आसामच्या मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांकडे राजीनामा सादर


गुवाहाटी, ६ मे (हिं.स.) : विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी लोक भवन येथे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आसाम विधानसभेसाठी ९ एप्रिल रोजी मतदान झाले होते, तर ४ मे रोजी मतमोजणी पार पडली. भारतीय जनता पक्ष ने एकट्याने ८२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. एनडीए आघाडीअंतर्गत लढलेल्या आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट या मित्रपक्षांनी प्रत्येकी १० जागा जिंकल्या. त्यामुळे एनडीए आघाडीने एकूण १०२ जागांवर विजय मिळवला.विरोधी पक्षांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ला १९ जागा मिळाल्या. तर इतर पक्षांमध्ये रायझर पार्टीला २, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ला २ आणि तृणमूल काँग्रेस ला १ जागा मिळाली. यावेळी डाव्या पक्षांना एकही जागा मिळाली नाही.

राजीनामा सादर केल्यानंतर डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत हा लोकशाहीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, जनतेच्या जनादेशाचा सन्मान म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून, १५ वी आसाम विधानसभा विसर्जित करण्याची विनंती राज्यपालांकडे करण्यात आली आहे.राज्यपालांनी नवीन सरकार स्थापन होईपर्यंत डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याचे निर्देश दिले आहेत. नव्या सरकार स्थापनेबाबत बोलताना त्यांनी “एनडीए ३.०” च्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. अधिक जबाबदारी आणि विकासाच्या वचनबद्धतेसह आसामच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

----------------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande