
अमृतसर, 06 मे (हिं.स.) : पंजाबच्या जालंधर येथील बीएसएफ मुख्यालयासमोर मंगळवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटानंतर रात्री उशिरा अमृतसरमध्येही मोठा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही घटनांची चौकशी सुरू केली आहे.
जालंधरनंतर आता अमृतसरमधील खासा कॅम्पजवळ असलेल्या आर्मी कॅम्पच्या बाहेर मंगळवारी रात्री उशिरा जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट रात्री सुमारे 11 वाजेनंतर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि लष्कराच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण परिसराला घेराव घालून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे.प्राथमिक तपासात स्फोटामुळे आर्मी कॅम्पच्या बाहेरील टीनच्या पत्र्यांना नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एनआयएची टीम अमृतसरला दाखल झाली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण परिसरात पोलिस आणि लष्कराची मोठ्या प्रमाणावर तैनाती करण्यात आली आहे. अमृतसर ग्रामीणचे एसपी आदित्य वारियर यांनी सांगितले की, माहिती मिळताच त्वरित कारवाई करण्यात आली असून तपास सुरू आहे. फॉरेन्सिक पथक पुरावे गोळा करत असून तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होईल.--------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी