
लातूर, 06 मे (हिं.स.)।
-पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेली अमानुष आणि संतापजनक घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ठरली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या निरागस चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याने समाजमन सुन्न झाले असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. मानवतेलाच काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा, फाशी देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी जनतेतून होत आहे. या पार्श्वभूमीवर लातूर येथील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला. लातूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आरोपीला जलदगती न्यायालयात खटला चालवून त्वरित फाशीची शिक्षा सुनावावी, अशी मागणी करण्यात आली.
“अशा नराधमांना समाजात जगण्याचा अधिकार नाही,” अशा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सरकारने कडक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, महिलांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्याची गरज अधिकच तीव्रतेने पुढे येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis