
सोलापूर, 06 मे, (हिं.स.)। आमदार देवेंद्र कोठे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. आजकाल जनतेच्या प्रश्नांना थेट उत्तर देण्याऐवजी आरोपांची धुरळेबाजी करणे ही काही सत्ताधाऱ्यांची राजकीय शैली बनली आहे.आ. देवेंद्र कोठे सकल हिंदू समाजाच्या आंदोलनात सहभागी का झाले नाही ते आधी सांगा? असा सवाल काँग्रेस नेते चेतन नरोटे यांनी विचारला आहे.
लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर ठोस भूमिका न घेता, प्रश्न विचारणाऱ्यांनाच लक्ष्य करण्याची प्रवृत्ती वाढताना दिसत आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या नातेवाईकांना काल पंढरपुरात जाऊन भेटले. पत्रकार परिषद घेऊन आरोपीला फाशी शिक्षेची मागणी केली हे देवेंद्र कोठेंना दिसत नसावे.
खासदार प्रणिती शिंदे ह्या सोलापूर शहरा जिल्हाच्या पाणीप्रश्नापासून रस्ते, विमानसेवा, घरकुल, शेतकरी, कामगार, आरोग्य, शिक्षण आणि अनेक प्रलंबित विकासकामांबाबत सातत्याने पाठपुरावा करून जनतेचे प्रश्न सोडवत आहेत. शासन, प्रशासन आणि मंत्रालयाच्या दारात जनतेसाठी आवाज उठवणे म्हणजे श्रेय घेणे नव्हे; ती जनतेप्रती असलेली जबाबदारी आहे.
निधीबाबत प्रश्न उपस्थित करणे हा लोकांचे विकासकामे करण्याचा भाग असतो. शहराच्या हक्काचा निधी वेळेवर आणि पुरेसा मिळावा, ही मागणी जनतेच्या हितासाठी असते. आणि ते काम समर्थपणे खासदार प्रणिती शिंदे करत आहेत. विकास निधी हा कोणाच्या घरातून आणलेला नसतो; तो जनतेच्या कराच्या पैशातून उभा राहतो. मग निधीचा प्रश्न विचारला की देवेंद्र कोठेना एवढा राग का येतो.
--------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड