
नागपूर, 6 मे (हिं.स.) : नागपूरच्या अजनी परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या ‘गोल्डन हँड्स हॉस्पिटल’चे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. ऑर्थोपेडिक क्षेत्रात आधुनिक, सुलभ आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने हे रुग्णालय डॉ. आकाश सावजी आणि डॉ. सोनल सावजी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले आहे.
या हॉस्पीटलमधील आधुनिक उपचारांबाबात माहिती देताना प्रसिद्ध ऑर्थोपेडिक व स्पाइन तज्ज्ञ डॉ. आकाश सावजी यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेविना उपचारांच्या माध्यमातून हाडे, सांधे आणि मणक्यांच्या अनेक आजारांवर प्रभावी उपचार शक्य आहेत.गेल्या दशकभरात त्यांच्या टीमने एक लाखांहून अधिक ओपीडी सल्लामसलत आणि पाच हजारांपेक्षा अधिक नॉन-सर्जिकल गुडघा उपचार यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. यामुळे राज्याबाहेरूनही अनेक रुग्ण उपचारासाठी नागपूरमध्ये येत असल्याचे त्यांनी नमूद केले. एकूण 15 खाटांच्या या रुग्णालयात गुडघेदुखी, फ्रोजन शोल्डर आणि मणक्यांच्या जुनाट समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. येथे अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, HEPA फिल्टरसह उच्च दर्जाची तंत्रज्ञान सुविधा तसेच गुडघा प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट आणि स्पाइन सर्जरीसारख्या मोठ्या शस्त्रक्रिया देखील उपलब्ध असतील.
रुग्णालयात एआय-आधारित रोबोटिक स्पाइन डीकंप्रेशन युनिट सुरू करण्यात आले असून दीर्घकालीन पाठदुखीवर कमी वेदनादायी आणि प्रभावी उपचार पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच फिजिओथेरपी, फार्मसी, आयसीयू आणि सेंट्रलाइज्ड एअर-कंडिशनिंगसह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत.अजनी परिसरातील स्थानामुळे विमानतळ, रेल्वे स्थानक आणि मेट्रोशी उत्तम संपर्क असल्याने रुग्णांसाठी हे केंद्र अधिक सोयीचे ठरणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान असूनही उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले.या उपक्रमाला ‘एजिंग हेल्दी फाउंडेशन’चे सहकार्य लाभले असून ही संस्था ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याचे काम करत आहे. लवकरच माध्यम प्रतिनिधी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाणार असल्याची माहितीही देण्यात आली.
मध्य भारतात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी डॉ. सावजी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांना अधिक दर्जेदार आणि सुलभ उपचार मिळतील, असा विश्वास देखील गडकरींनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Jitendra Tiwari