रत्नागिरी : कुंभार्ली घाटाचा राजा ईश्वर पाटील, राणी श्रावणी परिट
रत्नागिरी, 06 मे (हिं.स.) । किंग ऑफ कुंभार्ली राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत कुंभार्ली घाटाचा राजा ईश्वर पाटील, तर घाटाची राणी श्रावणी परिट हिला देण्यात आला. स्पर्धेला देशभरातून ४०० स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिपळूण सायकलिंग क्लब आयोजित
कुंभार्ली घाट स्पर्धा


रत्नागिरी, 06 मे (हिं.स.) । किंग ऑफ कुंभार्ली राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत कुंभार्ली घाटाचा राजा ईश्वर पाटील, तर घाटाची राणी श्रावणी परिट हिला देण्यात आला. स्पर्धेला देशभरातून ४०० स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चिपळूण सायकलिंग क्लब आयोजित या स्पर्धेच्या पाचव्या वर्षी पुरुष गटात धाराशिवच्या ईश्वर पाटील याने अवघ्या १ तास १ मिनिट १३ सेकंद या विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करत ‘कुंभार्ली घाटाचा राजा’ हा मानाचा किताब पटकावला. महिलांच्या गटात पुण्याच्या श्रावणी परिटने १ तास २६ मिनिटे ३४ सेकंदांत स्पर्धा पूर्ण करत ‘कुंभार्ली घाटाची राणी’ बनण्याचा मान मिळवला. यंदाच्या स्पर्धेत प्रत्येक गटात तुफान चुरस पाहायला मिळाली. अनेक गटांमध्ये अवघ्या काही मिलिसेकंदांच्या फरकाने विजेते निश्चित झाले.

स्पर्धेची सुरुवात सकाळी सहा वाजता सावरकर मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून करण्यात आली. साहिल डेव्हलपर्सचे सचिन कदम आणि रत्नागिरी ट्रायथलीट क्लबचे संस्थापक अमित कवितके यांच्या हस्ते स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. कुंभार्ली घाट माथ्यावर स्पर्धेचा समारोप झाला. त्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या समारंभात अनिरुद्ध निकम, जयेंद्रशेठ खताते, दशरथ दाभोळकर, नितीन ठसाळे, मंगेश पेढांबकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रमुख देणगीदार सचिन कदम, विनती ऑरगॅनिक्सचे प्रतिनिधी सुमेर तारे, कृष्णा केमिकल्सचे प्रतिनिधी सुयोग चव्हाण, सारस्वत बँकेचे प्रतिनिधी कल्पेश महाडीक यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

आमदार शेखर निकम यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल चिपळूण सायकलिंग क्लब आणि स्वयंसेवकांचे कौतुक केले. अल्पावधीत राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झालेल्या या स्पर्धेसाठी स्थानिक उद्योग आणि नेत्यांनी अधिक सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महिला मास्टर गटात अंजली भलिंगे (पुणे) प्रथम, रूपाली गिरमकर (पिंपरी-पुणे) द्वितीय तर ब्लांशे थेमुडो (गोवा) तृतीय ठरल्या. महिला एलिट गटात श्रावणी कृष्णात परिट (पुणे) प्रथम, योगेश्वरी महादेव कदम (सांगली) द्वितीय आणि श्रावणी उमेश घोडेस्वार (कोल्हापूर) तृतीय ठरली. पुरुष किड्स गटात आर्यन सुनील मालगे (कोल्हापूर) प्रथम, आर्यन संदीप जाधव (पलूस) द्वितीय तर साईराज तुषार भोईते (सातारा) तृतीय आला. पुरुष ज्येष्ठ गटात महेश किणी (ठाणे) प्रथम, प्रशांत तिडके (पुणे) द्वितीय आणि संतोष पवार (पुणे) तृतीय ठरले. पुरुष मास्टर गटात अनुप पवार (मुंबई) प्रथम, संजीव कुमार शर्मा (दिल्ली) द्वितीय तर श्रधीर सागर शिरझेम (नोएडा) तृतीय ठरले. पुरुष खुल्या गटात ईश्वर पाटील (धाराशिव) प्रथम, निहाल नदाफ (सांगली) द्वितीय आणि सिद्धेश पाटील (कोल्हापूर) तृतीय आला.

स्पर्धेच्या आयोजनासाठी पोफळी वीज मंडळ, राष्ट्रीय महामार्ग विभाग, विविध रुग्णालयांची वैद्यकीय पथके, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभल्याबद्दल चिपळूण सायकलिंग क्लबने कृतज्ञता व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande