
नाशिकमध्ये महात्मा फुलेंच्या विचारांवर व्याख्यान
नाशिक, 06 मे (हिं.स.) : “विचार वेगळे असले तरी संवाद तुटता कामा नये,” असे प्रतिपादन अहिल्यानगर येथील सुभाष वारे यांनी नाशिकमध्ये केले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘सत्यशोधक बनु या, आनंदाने जगु या’ या विषयावर अँड. द. तु. जायभावे स्मृती व्याख्यान पार पडले.सुभाष वारे यांनी सांगितले की, महात्मा फुले यांनी केवळ सामाजिक अन्यायाचा निषेध केला नाही, तर प्रत्येक वेळी कृतीशील कार्यक्रम दिला. महिलांचे शिक्षण, विधवांचे प्रश्न यांसारख्या विषयांवर त्यांनी धाडसी पुढाकार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.फुले यांच्या ‘गुलामगिरी’ ग्रंथाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, फुले यांचे विचार विद्रोही स्वरूपाचे असले तरी ते अभ्यासपूर्ण आणि व्यापक होते. त्यांच्या इंग्रजी भाषेतील ज्ञानामुळे त्यांचे वैचारिक क्षितिज अधिक विस्तारले होते, असेही त्यांनी नमूद केले.
रेनेसन्स चळवळ, तसेच वास्को द गामा आणि कोलंबस यांच्या ऐतिहासिक कथांचा संदर्भ देत वारे यांनी सांगितले की, चर्च किंवा प्रचलित विचारच अंतिम सत्य नसते, तर त्यापलीकडेही व्यापक विचार असतात. हीच भूमिका फुले यांच्या सत्यशोधकी विचारांमध्ये दिसून येते, असे त्यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठकसेन गोराणे यांनी सुभाष वारे यांचा सत्कार केला. तसेच दीपक वर्मा यांच्या चित्रप्रदर्शनाला रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला.यानंतर ‘सुनहरी यादें’ या संगीत कार्यक्रमातून हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगातील गाण्यांनी वातावरण भारावून गेले. श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
--------------------
-
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV