
कोल्हापूर, 06 मे (हिं.स.) : ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या अ-व्यावसायिक स्पर्धेविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या (AIOCD) नेतृत्वाखाली हा बंद आयोजित करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, औषध व्यवसाय हा Drugs and Cosmetics Act 1940 आणि नियम 1945 अंतर्गत नियंत्रित असला तरी, स्पष्ट कायदेशीर चौकट नसतानाही देशात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे.या पत्रकार परिषदेला कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रल्हाद खवरे, संचालक संजय शेटे, किरण जाधव आणि दाजीबा पाटील उपस्थित होते.
कायदेशीर मुद्दे आणि वाद
संघटनेच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने २८ ऑगस्ट २०१८ रोजी GSR 517(E) अंतर्गत अधिसूचना जारी केली होती, मात्र ती अद्याप कायद्यात रूपांतरित झालेली नाही. तसेच, दिल्ली उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिका प्रलंबित असून ऑनलाईन औषध विक्रीवर स्थगिती असल्याचा दावा संघटनेने केला आहे.कोरोना काळात २६ मार्च २०२० रोजी GSR 220(E) अंतर्गत औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. परंतु महामारी संपल्यानंतरही ही सवलत कायम ठेवण्यात आल्याने ऑनलाईन कंपन्या त्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
किंमत नियंत्रण आणि स्पर्धेचा मुद्दा
Drug Price Control Order (DPCO) 2013 नुसार औषधांवर मर्यादित नफा निश्चित करण्यात आला आहे. जीवनावश्यक औषधांवर केवळ ८% नफा असताना, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या २०% ते ५०% पर्यंत सूट देत असल्याने लहान विक्रेत्यांवर आर्थिक संकट निर्माण झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यामुळे देशातील सुमारे १२.५० लाख औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचा इशारा देण्यात आला आहे.
सरकारकडे नाराजी
संघटनेने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अनेकदा निवेदने दिली असूनही ठोस निर्णय न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.२० मे रोजी देशभरातील औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक औषधांचा आधीच साठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar