
रत्नागिरी, 06 मे (हिं.स.) । मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत बिहार राज्यातील जगप्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र बौद्धगया येथे भेट व दर्शनाची संधी ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बौद्ध धर्मातील चार सर्वांत पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या बौद्धधगया येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले असून अर्ज स्वीकृती प्रक्रिया २० मे २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, रत्नागिरी येथे अर्ज सादर करावेत.
ही यात्रा ३ जून ते ९ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. यात्रेचा प्रवास रेल्वेने होणार असून प्रवास, भोजन, निवास आदी खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असावे. तसेच अर्जदाराचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे बंधनकारक आहे. प्रत्येक पात्र व्यक्तीस या योजनेचा लाभ एका यात्रेसाठी एकदाच मिळणार आहे.
प्रवाशांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, रत्नागिरी यांच्याशी दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२३०९५७ वर संपर्क साधावा.राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासनामार्फत राबविण्यात येत असून मुंबई विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी