
पुणे, 06 मे (हिं.स.)। पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनापोटीचा मोबदला निश्चित झाला असून, बाधित शेतकऱ्यांना प्रतिएकर किमान एक कोटी ६१ लाख रुपये मिळणार आहेत. घर, फळबागा, बोअरवेल, बाधित घरांचा विचार करता जमिनीच्या मूळ दराच्या चौपटीपेक्षा दरानुसार सरासरी प्रति एकर दोन कोटी रुपयांपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
‘विमानतळासाठी जमिनी देण्यास संमती देणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या सात मेपासून कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर मोबदल्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे. संमती देणाऱ्यांसाठी सात मे ते १० जूनपर्यंत निधी वाटपाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. दहा जूननंतर सक्तीने भूसंपादन केले जाणार आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘राज्य शासनाच्या मान्यतेनंतर प्रतिएकर एक कोटी ५१ लाख ९० हजार ४९६ रुपये जमिनीचा दर निश्चित करण्यात आला होता. त्या दरावर अधिसूचनेनंतर एक मे २०२५ ते ३० एप्रिलपर्यंत १२ टक्क्यांनुसार नऊ लाख ११ हजार ४२९ रुपयांच्या व्याजासह एक कोटी ६१ लाख एक हजार ९२५ रुपये असा प्रति एकर दर राज्य सरकारने पुरंदरच्या शेतकऱ्यांना जाहीर केला आहे,’ असे डुडी यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु