परभणी - पीकविम्यासाठी शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन
परभणी, 06 मे (हिं.स.)। खरीप हंगाम २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवारी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. या आं
अ


परभणी, 06 मे (हिं.स.)। खरीप हंगाम २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवारी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार राहुल पाटील यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, २०२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन व तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी एआयसी या कंपनीकडे विमा हप्ता भरून लाखोंच्या संख्येने पीकविमा संरक्षण घेतले होते.

राज्य शासनाने ३ ऑक्टोबर, ९ ऑक्टोबर व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्देश जारी करून सोयाबीन पिकाचा ड्राएज रेशो पद्धतीत समावेश केला होता. ग्रीन वेट व ड्राय वेट या पद्धतीने नुकसानीचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्याचा प्रयत्न होता. मात्र, परभणी जिल्ह्यासाठी नियुक्त विमा कंपनीने तांत्रिक कारणे पुढे करत अनेक शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

निवेदनानुसार, जिल्ह्यातील १८ महसूल मंडळे या योजनेतून वगळण्यात आली असून परभणी तालुक्यातील नऊपैकी आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी होऊनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे संबंधित कंपनीने शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून विमा कंपनीला योग्य त्या सूचना देत प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande