
धाराशिव, 06 मे (हिं.स.)।
भक्ती आणि शक्तीचा अद्वितीय संगम साधणारा ‘श्री दत्त दुर्गा महाअनुष्ठानम्’ सोहळा तुळजापूर येथे मोठ्या भक्तिभावात आयोजित करण्यात येत आहे. गुरुतत्त्व प्रदीप परिवाराच्या वतीने हा भव्य आध्यात्मिक उपक्रम दि. ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.
या अनुष्ठानामध्ये १००८ श्री गुरुचरित्र पारायण, पंचकुंडात्मक सहस्त्र चंडीयाग, कुंकुमार्चन, सहस्त्र सवाष्णी पूजन, कुमारिका पूजन, अन्नदान व पेयजल सेवा अशा विविध धार्मिक सेवांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जागरण-गोंधळ, भोंडला व संस्कृती संवर्धनाचे उपक्रमही राबवले जाणार आहेत.
यापूर्वी श्री क्षेत्र गाणगापूर येथे नववे पारायण संपन्न झाले असून, दहाव्या पारायणासाठी तुळजापूरची निवड करण्यात आली आहे. अंधश्रद्धा दूर करून शुद्ध भक्तीचा संदेश देण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दरम्यान, १४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान ‘शक्तिपीठ जोगवा यात्रा’ देखील आयोजित करण्यात येणार असून, या संपूर्ण सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis