
लातूर, 06 मे (हिं.स.) : जिल्ह्यातील जलसंधारण कामांना गती देऊन पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त प्रकल्प पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी जलसंधारण कामांच्या संथगतीबद्दल नाराजी व्यक्त केली.
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्यासह राज्य व विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते. संजय राठोड यांनी जिल्ह्यातील विविध जलसंधारण कामांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचा आढावा घेतला. काही मंजूर कामे विविध कारणांमुळे रद्द झाल्याचे समोर आले असून, त्यापैकी कोणती कामे पुन्हा प्रस्तावित करता येतील याची पडताळणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.सन 2022-23 पासून काही कामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले असून ती तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच काही योजनांसाठी आवश्यक पाणी उपलब्धता प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळविण्याचे निर्देशही देण्यात आले.
गुणवत्ता आणि पारदर्शकतेवर भर
मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना आणि जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत होणारी सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावीत, असे मंत्री राठोड यांनी स्पष्ट केले. या कामांची जिओ-टॅगिंग आवश्यक असून, आवश्यकतेनुसार त्रयस्थ संस्थांकडून तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भूसंपादन आणि प्रलंबित प्रकल्प
भूसंपादनामुळे रखडलेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पाझर तलाव दुरुस्ती, जुन्या जलसंधारण कामांची दुरुस्ती आणि नवीन प्रकल्पांचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेशही देण्यात आले.
पावसाळ्यापूर्वी नियोजनाचे निर्देश
सध्या पुरेसा पाणीसाठा असला तरी 'एल निनो'मुळे संभाव्य पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज असल्याचे मंत्री राठोड यांनी सांगितले. सर्व प्रगतीपथावरील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सातत्याने पाठपुरावा करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत जिल्हा जलसंधारण अधिकारी जावेद पटेल आणि संजय नाईक यांनी गेल्या पाच वर्षांतील कामांचा सविस्तर अहवाल सादर केला.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis