टीव्हीकेकडून सरकार स्थापनेचा दावा, विजय यांनी घेतली राज्यपालांची भेट
चेन्नई, 06 मे (हिं.स.)।तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 च्या निकालानंतर तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) ने राज्यात सरकार स्थापन करण्याची हालचाल सुरू केली आहे. टीव्हीके प्रमुख विजय यांनी बुधवारी राजभवनात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेतल
विजय यांनी घेतली राज्यपालांची भेट, टीव्हीकेचा सरकार स्थापन करण्याचा दावा


चेन्नई, 06 मे (हिं.स.)।तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 च्या निकालानंतर तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) ने राज्यात सरकार स्थापन करण्याची हालचाल सुरू केली आहे. टीव्हीके प्रमुख विजय यांनी बुधवारी राजभवनात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेतली. त्यांनी राज्यात सरकार स्थापनेचा दावा सादर केला. चेन्नई येथे विजय यांनी राज्यपालांना पक्षाच्या आमदारांच्या समर्थनाचे पत्र सुपूर्द केले. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या पक्षाने सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे. मात्र, बहुमताच्या आकड्यापासून ते काही जागांनी दूर राहिले होते. दरम्यान, काँग्रेसने डीएमकेशी असलेली आपली युती तोडून विजय यांच्या पक्षाला समर्थन देण्याची घोषणा केली आहे.

तमिळनाडूच्या 234 सदस्यीय विधानसभेत सरकार स्थापनेसाठी 118 जागांची गरज असते. या निवडणुकीत विजय यांच्या टीव्हीकेला 108 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस पक्षाने टीव्हीकेला समर्थन देण्याचा निर्णय घेतला असून, काँग्रेसकडे विधानसभेत 5 जागा आहेत. राज्यपालांशी भेटीनंतर आता सरकार स्थापनेच्या औपचारिकता पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार, विजय 7 मे रोजी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. विजय यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर पहिल्याच प्रयत्नात त्यांनी मिळवलेले हे मोठे यश राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवणारे ठरले आहे.

काँग्रेसने दीर्घकाळ सहयोगी असलेल्या डीएमकेशी नातं तोडून सरकार स्थापनेसाठी विजय यांच्या टीव्हीकेला समर्थन देण्याची घोषणा केली. काँग्रेसने सांगितले की, टीव्हीके प्रमुख विजय यांनी समर्थनाची मागणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत पक्षाच्या मुख्यालय ‘सत्यमूर्ती भवन’ येथे फटाके फोडून आनंद साजरा केला.

तमिळनाडू काँग्रेसचे प्रभारी गिरीश चोडणकर म्हणाले, “आज आम्ही आमचे आमदार आणि वरिष्ठ नेत्यांसह टीव्हीकेचे नेते विजय यांची भेट घेतली. आम्ही त्यांना पूर्ण समर्थन दिले आहे. समर्थन पत्र दिल्यानंतर आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि महासचिव वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली. विजय यांनी तिन्ही नेत्यांचे आभार मानले. राज्यपाल त्यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी आमंत्रित करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत डीएमकेला 59 आणि एआयएडीएमकेला 47 जागा मिळाल्या आहेत. इतर पक्षांमध्ये पीएमकेला 4 आणि आययूएमएलला 2 जागा मिळाल्या. सीपीआय, व्हीसीके आणि सीपीआयएम यांनाही प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळाला आहे. भाजप, डीएमडीके आणि एएमएमके यांच्या खात्यात प्रत्येकी 1 जागा आली आहे. टीव्हीकेला सर्वाधिक 108 जागा मिळाल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande