प. बंगाल हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत ८० जणांना अटक; अनधिकृत मिरवणुकांवर बंदी
कोलकाता, ६ मे (हिं.स.) : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या असून, राजधानी कोलकात्यात कडक बंदोबस्त लागू करण्यात आला आहे. शहरातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात ये
WB Police Crackdown Violence 80 Arrested Ban Unauthorized Processions


कोलकाता, ६ मे (हिं.स.) : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या असून, राजधानी कोलकात्यात कडक बंदोबस्त लागू करण्यात आला आहे. शहरातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

कोलकाता पोलिस आयुक्त अजय कुमार नंद यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. शहरातील प्रत्येक घडामोडीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून, गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

न्यूटाउन परिसरात घडलेल्या घटनेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, ती दोन गटांतील वादातून निर्माण झाली होती. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, विविध ठिकाणांहून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. काही असामाजिक घटक जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आतापर्यंत शहरातील विविध भागांतून एकूण ८० जणांना अटक करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच असून, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विजय साजरा करण्यासाठी काढल्या जाणाऱ्या मिरवणुकांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. कोणतीही मिरवणूक काढण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून, परवानगीशिवाय मिरवणूक काढल्यास कारवाई केली जाईल. तसेच जल्लोषाच्या वेळी जेसीबी यंत्राचा वापर पूर्णपणे बंदी घालण्यात आला आहे.

सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून कोलकात्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ६५ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, २४० तातडी प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याचेही पोलिसांनी नमूद केले.

सध्या कोलकात्यातील परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande