
कोल्हापूर, 06 मे (हिं.स.)। जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र (योगासन), कोल्हापूर येथील खेळाडू रोहित चव्हाण याची ४ ते ८ जून २०२६ दरम्यान ट्रान्स स्टेडिया स्टेडियम, अहमदाबाद (गुजरात) येथे होणाऱ्या पहिल्या जागतिक योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
रोहितने यापूर्वी २९ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ दरम्यान संगमनेर येथे झालेल्या सहाव्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत वरिष्ठ गटातील सुपाईन प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची १ ते ३ मे २०२६ दरम्यान सोनीपत (हरियाणा) येथे झालेल्या निवड चाचणीसाठी निवड झाली होती.
देशभरातील एशियन व राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंमधून त्याची अंतिम निवड जागतिक स्पर्धेसाठी करण्यात आली.
रोहित हा कोल्हापूर जिल्ह्यातून अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी वरिष्ठ गटात निवड होणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याचे जागतिक स्पर्धेचे सराव शिबिर ९ मे ते २ जून २०२६ या कालावधीत साई सेंटर, अहमदाबाद येथे पार पडणार आहे.
राज्य क्रीडा मार्गदर्शक योगासन प्रशिक्षक रविभूषण कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित सराव करत आहे. त्याच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा सुहास पाटील तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी त्याचे अभिनंदन करून जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar