
नवी दिल्ली, 06 मे (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२६ च्या प्लेऑफचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, प्लेऑफसाठी स्पर्धा करणाऱ्या संघांमध्ये चुरस वाढत आहे. ७० लीग सामन्यांनंतर सर्वजण मंडळाकडून वेळापत्रक जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता वेळापत्रक जाहीर झाले असून, बंगळूरुकडून अंतिम सामन्याचे यजमानपद काढून घेतल्याची मोठी चर्चा आहे. मंडळाने यजमानपदाचे हक्क अहमदाबादला दिले असून, हा सामना ३१ मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.
आयपीएल २०२६ चा अंतिम सामना मूळतः बंगळूरुमध्ये होणार होता. बीसीसीआयने अचानक ठिकाण बदलून अंतिम सामना अहमदाबादला दिला. बोर्ड सचिव देवजित सैकिया यांनी एका निवेदनात म्हटले आहे, मूळतः अंतिम सामन्याचे आयोजन बंगळूरु येथे करण्यात आले होते. पण स्थानिक संघटना आणि प्रशासनाच्या काही अटींमुळे, ज्या बीसीसीआयच्या स्थापित मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांच्या कक्षेबाहेर होत्या, स्थळ बदलण्यात आले.
कोणत्या परिस्थितीमुळे बंगळूरुला यजमानपदाचे हक्क मागे घ्यावे लागले, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. काही माध्यमांच्या वृत्तांनुसार, तिकीट वादामुळे बंगळूरुकडून अंतिम सामन्याचे यजमानपद काढून घेण्यात आले. तथापि, सध्याचे सर्वात मोठे गूढ हे आहे की बंगळूरुकडून अंतिम सामना मागे घेणे ही केवळ एक प्रशासकीय बाब होती, की त्यामागे आणखी काही कहाणी आहे?
यावर्षी आयपीएल प्लेऑफ तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळले जातील. बीसीसीआयने याला एक विशेष परिस्थिती म्हणून नमूद केले आहे. बोर्डाने म्हटले आहे, कार्यवाही आणि लॉजिस्टिकल कारणांमुळे, आयपीएल २०२६ चे प्लेऑफ या हंगामात तीन ठिकाणी आयोजित केले जातील.
संपूर्ण प्लेऑफ वेळापत्रक
क्वालिफायर १
२६ मे: हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला
हा सामना गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये होईल. विजेता संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.
एलिमिनेटर
२७ मे: न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, न्यू चंदीगड (मुलानपूर)
तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांमधील सामना. पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर होईल.
क्वालिफायर २
२९ मे: न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, न्यू चंदीगड (मुलानपूर)
क्वालिफायर १ मधील पराभूत संघ एलिमिनेटरच्या विजेत्या संघाशी सामना करेल. विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर होईल.
अंतिम सामना
३१ मे: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
हंगामातील विजेतेपदाचा सामना क्वालिफायर १ चा विजेता आणि क्वालिफायर २ चा विजेता यांच्यात खेळला जाईल.
यापूर्वीचा अंतिम सामना देखील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळला गेला होता. त्या सामन्यात आरसीबीने पंजाबला हरवून विजेतेपद पटकावले. याचा अर्थ असा की, सलग दुसऱ्यांदा अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. या मैदानावर यापूर्वी मोठे आयपीएल सामने आणि अंतिम सामने आयोजित करण्यात आले आहेत. आयपीएल २०२४ चा अंतिम सामना चेपॉकमध्ये खेळला गेला होता, कारण २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने विजेतेपद पटकावले होते.
सलग दोन वर्षे विजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर अंतिम सामना खेळवला गेला नाही. आयपीएल २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळला गेला होता, कारण २०२२ मध्ये गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले होते. आयपीएल २०२२ चा अंतिम सामना देखील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला होता, जिथे गुजरातने राजस्थानला पराभूत केेले होते. आयपीएल २०२१ चा अंतिम सामना दुबईमध्ये खेळला गेला होता. याचा अर्थ असा की, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमने गेल्या पाच वर्षांत चार वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्याचे आयोजन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे