तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसचा टीव्हीकेला पाठिंबा
नवी दिल्ली, 06 मे (हिं.स.) । तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेसंदर्भात एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेस पक्षाने तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) आणि त्याचे नेते विजय यांना औपचारिकपणे पाठिंबा जाहीर केला आहे. तर आपला सर्वात जुना राष्ट्रीय मित्
तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसचा टीव्हीकेला पाठिंबा


नवी दिल्ली, 06 मे (हिं.स.) । तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेसंदर्भात एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेस पक्षाने तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) आणि त्याचे नेते विजय यांना औपचारिकपणे पाठिंबा जाहीर केला आहे. तर आपला सर्वात जुना राष्ट्रीय मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने अचानक घेतलेल्या या भूमिकेला डीएमकेने 'पाठीत खंजीर खुपसणे' म्हटले आहे. या निवडणुकीत डीएमकेचा दारुण पराभव झाला असून, आता त्यांच्या सर्वात जुन्या मित्रपक्षानेही साथ सोडल्याने अत्यंत तणावपूर्ण राजकीय वातावरण निर्माण झाले आहे.

डीएमकेचे प्रवक्ते सरवणन अण्णादुराई यांनी सांगितले की, टीव्हीकेसोबत युती करण्याचा आणि त्यांना पाठिंबा देण्याचा काँग्रेस पक्षाचा निर्णय हा एक गंभीर विश्वासघात आहे. त्यांनी तीव्र शब्दांत सांगितले की, काँग्रेसने केवळ डीएमकेच्याच नव्हे, तर तामिळनाडूच्या जनतेच्याही पाठीत खंजीर खुपसला आहे. आपली तीव्र नाराजी व्यक्त करताना अण्णादुराई म्हणाले की, काँग्रेसने तामिळनाडूच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचाही घोर अपमान केला आहे. हे इतक्या घाईने घडले आहे की, निवडणूक प्रक्रिया पूर्णही झालेली नाही आणि काँग्रेसने टीव्हीकेसोबत हातमिळवणी केली आहे.

काँग्रेसने म्हटले आहे की, राज्यातील जनतेने टीव्हीकेला स्पष्ट, भक्कम आणि प्रचंड बहुमत दिले आहे. या पार्श्वभूमीवर, तामिळनाडू काँग्रेस समिती आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. टीव्हीकेने आपल्या पहिल्याच निवडणुकीत डीएमके आणि एआयएडीएमके सारख्या जुन्या पक्षांना कडवी झुंज देत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की, जोपर्यंत टीव्हीके आपल्या आघाडीत कोणत्याही जातीयवादी शक्तींचा समावेश करत नाही, तोपर्यंतच त्यांचा पाठिंबा कायम राहील. पक्षाने स्पष्ट केले की, ही आघाडी केवळ संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या पक्षांसोबतच केली जाईल.

काँग्रेस पक्षाने असेही म्हटले आहे की, ही आघाडी पेरियार आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या आदर्शांसह सामाजिक न्याय आणि संविधानाच्या मूल्यांना पुढे नेण्यासाठी काम करेल. काँग्रेसने संकेत दिले आहेत की ही आघाडी केवळ सरकार स्थापन करण्यापुरती मर्यादित राहणार नाही, तर आगामी लोकसभा, राज्यसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही ती कायम राहील. २३४-सदस्यीय विधानसभेत टीव्हीके सध्या १०८ जागांसह आघाडीवर असून, बहुमतासाठी त्यांना थोड्या जागा कमी आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande