
सोलापूर, 06 मे (हिं.स.)। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी दोन्ही महिला खासदार आक्रमक झाल्या. खासदार वाघमारे यांनी निषेध आंदोलनात सहभागी होत फाशीची मागणी केली .
चिमुरडीच्या अत्याचारप्रकरणी आज सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सत्ताधारी भाजप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी खासदार ज्योती वाघमारे, महापौर विनायक कोंड्याल, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, नगरसेवक अमोल शिंदे, चेतन नरोटे, सातलिंग शटगार यांच्यासह महिला व तरुणींचा सहभाग होता.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर झालेल्या निषेध आंदोलनात तळपत्या उन्हात सर्वच पदाधिकारी घामाघूम झाले होते. मात्र, चिमुकलीस न्याय देण्यासाठी सत्ताधारी व विरोधक एकत्र येत आरोपीस कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी खासदार वाघमारे यांनी घोषणाबाजी करत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. खासदार प्रणिती शिंदे यांनी आंदोलनात सहभागी न होता स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला दोषी ठरवले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड