
नवी दिल्ली, 06 मे (हिं.स.) भारतीय संघाने नुकतेच थॉमस कपमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचला. पण, विमानतळावर चाहत्यांकडून पाठिंबा न मिळाल्याने भारतीय बॅडमिंटनपटूंचे हे यश लवकरच निराशेमध्ये बदलले. सात्विकसाईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी, लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत यांच्याशी विमानातील भारतीय प्रवाशांनी त्यांच्या कामगिरीबद्दल साधी विचारपूसही केली नाही. यामुळे भारतीय बॅडमिंटनपटू खूप निराश झाले. भारतासारख्या देशात बॅडमिंटनला व्यावसायिक खेळ म्हणून स्वीकारले गेले आहे की नाही, असा प्रश्न त्यांना पडू लागला.
सात्विकने कबूल केले की, जेव्हा तो जर्मनीहून हैदराबादला विमानात चढला, तेव्हा त्याला आयपीएल आणि राजकारणावर अधिक लक्ष केंद्रित केलेले दिसले. तो कोण आहे किंवा त्याने कोणती मोठी कामगिरी केली आहे, हे एकाही व्यक्तीने विचारले नाही हे पाहून तो थक्क झाला. आम्ही विमानतळावर होतो. जर्मनी ते हैदराबादचा विमानप्रवास सुमारे सात तासांचा होता. आम्ही कोण आहोत किंवा आम्ही कोणते पदक जिंकले आहे, हे कोणीही आम्हाला विचारले नाही. तिथे बरेच भारतीय होते, ज्यात अनेक तेलगू लोकांचा समावेश होता. आम्ही थॉमस कपची जर्सी घातली होती, पण सगळे आयपीएल आणि राजकारणाबद्दल बोलण्यात व्यस्त होते. २०२२ मध्ये जेव्हा आम्ही सुवर्णपदक जिंकले, तेव्हाही असेच घडले होते. आम्ही अधिक जल्लोष करू शकलो असतो. लोकांना हे कळत नाही की अशा संधी पुन्हा मिळणार नाहीत. थॉमस कप जिंकणे कठीण आहे आणि पदक जिंकणे त्याहूनही कठीण आहे.
चिराग शेट्टी म्हणाला, कोणालाच पर्वा नाही असे वाटत होते. विमानतळावर गर्दी आमचे स्वागत करेल अशी आम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती. मागच्या वेळी जेव्हा आम्ही जिंकलो, तेव्हा आमचे चांगले स्वागत झाले, आम्ही पंतप्रधानांना भेटलो आणि आमचा सन्मान झाला. पण जल्लोष जसा व्हायला हवा होता तसा झाला नाही. जे बॅडमिंटनचे चाहते आहेत त्यांनी आमच्यासाठी टाळ्या वाजवल्या. पण सर्वसामान्य जनतेला २०२२ च्या विजयाचे महत्त्व समजले नाही. आपण एक क्रीडाप्रेमी राष्ट्र बनलो नाही, हे लक्षात आल्यावर मला दुःख होते. सरकार आणि संघटना खूप प्रयत्न करत आहेत, पण यशाचा उत्सव तर अजून सुरूच झालेला नाही.
रेड्डी म्हणाला की, जेव्हा चिरागच्या विजयाचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा मला आनंद झाला. पण मग मला आठवले की, कोणीही काहीही न करता लाखो फॉलोअर्स मिळवू शकतो. मी स्वतःलाच विचारलं, 'का?' इथे आम्ही जिंकण्यासाठी खेळतो आणि जर कोणी जखमी झालं, तर त्याच्या जागी दुसरा कोणी नसतो. आम्ही सांघिक स्पर्धा कोणाच्याही पाठिंब्याशिवाय आणि प्रचंड दबावाखाली खेळतो. पण मागच्या वेळी विजेतेपद पुरेसं नव्हतं, आणि या वेळी कांस्यपदकही पुरेसं नव्हतं. मी प्रणॉयला सांगितलं की मी माझ्या मुलाला बॅडमिंटन खेळू देणार नाही. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर असाल आणि परिस्थिती सांभाळू शकत असाल, तर ठीक आहे; नाहीतर, सातत्याने चांगली कामगिरी करणं कठीण होतं, कारण देशातील मोठा वर्ग तुमच्या कामगिरीचं कौतुक करत नाही. हैदराबाद अकादमीमध्ये आमचा सन्मान झाला. एक छोटा पुष्पगुच्छ आणि केक कापण्याचा सोहळा पुरेसा होता. आम्ही मोठ्या अपेक्षा ठेवत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे