
नवी दिल्ली, 06 मे, (हिं.स.) - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नवीनतम टी२० आंतरराष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली आहे. भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. या ताज्या क्रमवारीत बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनाही फायदा झाला आहे.
९ मार्चपासून एकही आंतरराष्ट्रीय टी२० सामना न खेळताही, टी२० आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत अभिषेक शर्मा अव्वल स्थानी कायम आहे. इशान किशन दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान तिसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट चौथ्या, श्रीलंकेचा पथुम निस्संका पाचव्या, भारताचा तिलक वर्मा सहाव्या, भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव सातव्या, इंग्लंडचा जोस बटलर आठव्या, दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रुईस नवव्या आणि झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेट दहाव्या स्थानी आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा राशिद खान पहिल्या, भारताचा वरुण चक्रवर्ती दुसऱ्या, पाकिस्तानचा अबरार अहमद तिसऱ्या, इंग्लंडचा आदिल रशीद चौथ्या, भारताचा जसप्रीत बुमराह पाचव्या, ऑस्ट्रेलियाचा ॲडम झाम्पा सहाव्या, दक्षिण आफ्रिकेचा कॉर्बिन बॉश सातव्या, वेस्ट इंडिजचा मॅथ्यू फोर्ड आठव्या, अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान नवव्या आणि ऑस्ट्रेलियाचा नॅथन एलिस दहाव्या क्रमांकावर आहे.
न्यूझीलंडच्या 'बी' संघाने काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये तीन टी-२० सामने खेळले. ही मालिका अनिर्णित राहिली. बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी टी-२० फलंदाजी आणि गोलंदाजी क्रमवारीत प्रगती केली आहे. मालिकावीर ठरलेल्या बांगलादेशच्या तौहीद हृदोयने फलंदाजी क्रमवारीत ३७ व्या स्थानावर झेप घेतली आहे. गोलंदाजीमध्ये, बांगलादेशचा महेदी हसन एका स्थानाने वर चढून १७ व्या स्थानावर पोहोचला आहे, तर शरीफुल इस्लामने नऊ स्थानांची लक्षणीय झेप घेत ५४ वे स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडचा बेन सियर्स १० स्थानांनी वर चढून ५१ व्या स्थानावर पोहोचला आहे. इश सोधी चार स्थानांनी वर चढून ८८ व्या स्थानावर पोहोचला आहे. सोधीने १६५ बळी घेत टिम साउथीला (१६४) मागे टाकत, टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचा मानही मिळवला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे