
मुंबई, 06 मे, (हिं.स ) झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघांची ही तुटेना' सध्या एका अतिशय मनोरंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत एका अशा पात्राची एन्ट्री झाली आहे, ज्यामुळे कथानकात मोठी उलथापालथ होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री पूर्वा गोखले या मालिकेत 'किमया' ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून, या निमित्ताने प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पुन्हा एकदा झी मराठीच्या कुटुंबात परतली आहे. किमया हे केवळ एक नवीन पात्र नसून ती समरची जुनी मैत्रीण आणि त्याची Ex-गर्लफ्रेंड आहे. परदेशातून भारतात परतल्यानंतर ती थेट समरच्या घरी राहायला येते, ज्यामुळे घरातील वातावरण आणि नात्यांची समीकरणे पूर्णपणे बदलून जाणार आहेत.
पूर्वा गोखले यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगताना स्पष्ट केल की, ‘किमया’ ही व्यक्तिरेखा अतिशय मनमोकळी, आनंदी आणि समोरच्या व्यक्तीचा किंवा परिस्थितीचा विचार न करता मनात येईल ते स्पष्टपणे बोलणारी मुलगी आहे. किमया आणि समरची मैत्री खूप जुनी आणि घट्ट असल्याने त्यांच्यातील जवळीक पाहून स्वानंदीच्या मनात जेलसी निर्माण होताना दिसणार आहे. ४० वर्षांची असूनही किमयाचा उत्साह एखाद्या विशीतल्या मुलीसारखा आहे. पाश्चिमात्य पेहराव आणि बिनधास्त स्वभाव यामुळे हे पात्र प्रेक्षकांसाठी नक्कीच वेगळे आणि मनोरंजक वाटेल.
प्रेक्षकांसाठी सर्वात मोठं आकर्षण म्हणजे सुबोध आणि मी तब्बल १५-१६ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर एकत्र दिसत आहोत. २०१० मध्ये 'कुलवधू' मालिकेत विक्रमादित्य आणि देवयानी या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. तेव्हापासून ही जोडी पुन्हा एकत्र कधी दिसणार, अशी विचारणा चाहते माझ्याकडे सातत्याने करत होते. मला आशा आहे कि हे भाग प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेचे दिग्दर्शक 'कुलवधू'च्या वेळी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते, त्यामुळे सेटवर मला 'कंफर्ट झोन' मिळाला. जुनी मैत्री असल्याने सुबोधसोबत काम करताना कोणताही संकोच वाटला नाही.
गेल्या काही काळापासून मी हिंदी मनोरंजन सृष्टीत व्यस्त होते , त्यामुळे मराठी प्रेक्षकांपासून काहीशा दूर झाले होते आणि मराठी प्रेक्षक वारंवार मला पुन्हा मराठी मालिकांकडे वळण्याची विनंती करत होते. किमयाच्या निमित्ताने एक सशक्त आणि आव्हानात्मक पात्र मिळाल्यामुळे मी हा रोल स्वीकारला. जेव्हा किमयाच प्रोमो प्रेक्षकांनी पहिला तेव्हा जो उदंड प्रतिसाद मिळाला, त्यावरून ही जोडी आजही प्रेक्षकांच्या तितकीच पसंतीस उतरत असल्याचे सिद्ध झाले आहे.
आता किमायाच्या येण्याने समर आणि स्वानंदीच्या आयुष्यात काय वादळ येत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तेव्हा बघायला विसरू नका 'वीण दोघातली ही तुटेना' दररोज संध्या. ७:१५ वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर