
पुणे, 06 मे, (हिं.स.)। ‘पंढरपूरला जाण्यासाठी पुण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि संघटनांकडून जागोजागी मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावले जातात. तसेच फटाकेदेखील फोडले जातात. यामुळे वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना व्यत्यय येतो. भजन आणि अभंग गाताना अडथळे निर्माण होतात. त्यामुळे पालखीच्या स्वागतासाठी ध्वनिक्षेपक आणि फटाक्यांवर बंदी घालावी,’ अशी मागणी पालखी सोहळा प्रमुखांनी पुण्याचे महापौर मंजूषा नागपुरे यांच्याकडे केली.
संत ज्ञानेश्वर महाराज, तसेच संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूर येथे जाताना दोन दिवस पुणे मुक्कामी असतो. या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यवस्थापन सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा आढावा महापौरांनी घेतला. या वेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, महापालिकेतील पक्षनेते, पोलीस अधिकारी, तसेच पालखी सोहळा विश्वस्त उपस्थित होते. त्या वेळी ही मागणी करण्यात आली. यावर योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे नागपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
--------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु