
नवी दिल्ली, 10 जून (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सलग पदावर राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान ठरले आहेत. बुधवारी त्यांच्या कार्यकाळाचे ४,३९९ दिवस पूर्ण झाले. यासह त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा ४,३९८ दिवसांचा विक्रम मागे टाकला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय जनता पक्षाने (भाजपा) त्यांचे अभिनंदन केले आहे.
बुधवारी भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या उपलब्धीबाबत माहिती देताना सांगितले की, भारताच्या लोकशाही इतिहासात आज एक नवे सुवर्णपान जोडले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वाधिक काळ सलग सेवा देणारे निवडून आलेले पंतप्रधान बनले आहेत. ४,३९९ दिवसांची ही अखंड सेवा राष्ट्राप्रती त्यांच्या अद्वितीय समर्पणाचे प्रतीक आहे.ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने विश्वास, विकास आणि जनकल्याणाला समर्पित अशी १२ वर्षे पूर्ण केली आहेत. ‘संकल्प ते सिद्धी’ हा गौरवशाली कालखंड भारताच्या विकास, सुरक्षा, आर्थिक सक्षमीकरण आणि जागतिक प्रतिष्ठेतील अभूतपूर्व वाढीचा साक्षीदार ठरला आहे.
नितीन नवीन यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने अनेक ऐतिहासिक बदल अनुभवले आहेत. वित्तीय समावेशन, डिजिटल क्रांती आणि ‘एक राष्ट्र, एक कर’ व्यवस्थेमुळे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासनाला नवी बळकटी मिळाली आहे. तसेच संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, उत्पादन क्षेत्राला मिळालेले प्रोत्साहन आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे विकासाला नवी गती मिळाली आहे.
श्रीराम जन्मभूमी मंदिराचे भव्य निर्माण, कलम ३७० रद्द करणे आणि इतर अनेक दूरगामी निर्णय देशाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे टप्पे ठरले आहेत.भाजपाध्यक्ष नितीन नवीन यांनी पुढे सांगितले की, आज देशातील प्रत्येक नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत २०४७’ हे स्वप्न साकार करण्यासाठी सामूहिक संकल्पाने पुढे जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule