नाशिकच्या ब्राह्मणगावची महिला तलाठी दहा हजारांची लाच घेताना जाळ्यात
नाशिक, 10 जून (हिं.स.)। सातबारा उतार्यावर असलेला कर्जाचा बोजा कमी करणे व वारस नोंदीत दुरुस्ती करण्याच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच घेताना ब्राह्मणगाव (ता. बागलाण) येथील तलाठी मनीषा नारायण बाविस्कर (वय 36) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी
नाशिकच्या ब्राह्मणगावची महिला तलाठी दहा हजारांची लाच घेताना जाळ्यात


नाशिक, 10 जून (हिं.स.)। सातबारा उतार्यावर असलेला कर्जाचा बोजा कमी करणे व वारस नोंदीत दुरुस्ती करण्याच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच घेताना ब्राह्मणगाव (ता. बागलाण) येथील तलाठी मनीषा नारायण बाविस्कर (वय 36) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सटाणा तहसील कार्यालयात रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारदाराच्या मौजे ब्राह्मणगाव येथील शेत गट क्रमांक 824 वर भाऊसाहेब हिरे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, ब्राह्मणगाव यांचा चार लाख रुपयांचा कर्जाचा बोजा होता. कर्जमाफी अंतर्गत तो कमी झाला नव्हता. तसेच वारस नोंदीवेळी चुकीने नमूद झालेले नाव कागदोपत्री दुरुस्त करण्यासाठी तक्रारदारांनी अर्ज केला होता. हे काम करून देण्यासाठी तलाठी मनीषा बाविस्कर यांनी स्वतःसह मंडळ अधिकार्यांसाठी 10 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. त्यानंतर 27 एप्रिल रोजी पडताळणी दरम्यान बाविस्कर यांनी सटाणा येथील जिजामाता मराठा हायस्कूलमध्ये जनगणना प्रशिक्षणावेळी तसेच तहसील कार्यालयात लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

मात्र, मंडळ अधिकार्यांनी लाचेची मागणी केल्याचे आढळले नाही.यानंतर मंगळवारी एसीबीने सापळा रचला. सटाणा तहसील कार्यालयात तक्रारदारांकडून 10 हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना बाविस्कर यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande