
खोलापूर पोलिसांची कारवाई; ६० हजारांचा चोरीचा मुद्देमाल व वाहन जप्त
अमरावती, १० जून (हिं.स.) : बोरखडी बुद्रुक परिसरातील विहीर बांधकामासाठी वापरण्यात येणारे लोखंडी साहित्य चोरणाऱ्या टोळीचा खोलापूर पोलिसांनी पर्दाफाश करत सहा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीचा संपूर्ण मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
फिर्यादी दामोदर अण्णाजी पवार (वय ६६, रा. बोरखडी बुद्रुक) हे विहीर खोदकाम व बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी बोरखडी खुर्द येथील सुरज शरदराव राऊत यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम हाती घेतले होते. ५ जून २०२६ रोजी काम तात्पुरते बंद करून त्यांनी बांधकामासाठी लागणारे साहित्य शेतात सुरक्षित ठेवले होते.
मात्र, ८ जून रोजी सकाळी शेतात गेल्यानंतर २० लोखंडी तराफे आणि सिमेंट कालवण्यासाठी वापरले जाणारे दोन लोखंडी टप असा सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी खोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी बोरखडी बुद्रुक येथील काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली देत साहित्य टाटा २०७ (एमएच-०४-एफपी-०५२०) वाहनातून खोलापूर येथील भंगार बाजारात विकल्याची माहिती दिली.
या प्रकरणात अनिल रामचंद सोळंके, दिवाकर सुरेश सोळंके, प्रशांत नामदेवराव चव्हाण, उमर खान साहेब खान, अमीन खान बने खान आणि वाहन चालक प्रथमेश संजय कुंभेकर यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले २० लोखंडी तराफे, दोन लोखंडी टप तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले टाटा २०७ वाहन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ६० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली खोलापूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी