
रायगड, 10 जून (हिं.स.)। नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलावर गोळीबार झाल्याच्या गंभीर प्रकरणाचा नेरळ पोलिसांनी यशस्वी छडा लावत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्पर तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास नेरळ परिसरातील एका अल्पवयीन मुलगा घराजवळ खेळत असताना अज्ञात व्यक्तीने जंगलातील प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने बंदुकीतून गोळीबार केला. यावेळी झाडलेली गोळी मुलाला लागल्याने त्याच्या दोन्ही मांडी तसेच दोन्ही हातांना दुखापत झाली. जखमी मुलाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नेरळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२५, १२५(अ) तसेच भारतीय हत्यार अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली.
रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे तसेच कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक पातळीवरील चौकशीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला.
तपासादरम्यान आरोपीची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून गुन्ह्यात वापरण्यात आलेली बंदूक जप्त केली. या कारवाईमुळे प्रकरणाचा यशस्वी उलगडा झाला आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी सुशील काजळेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार राजाराम पिंगळे, महेश खंडागळे, सचिन वाघमारे, निलेश कोंढार तसेच पोलीस अमलदार राजेभाऊ केकान, आशु बेंद्रे, विनोद वांगेकर आणि कुशल काळोखे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात मोलाचे योगदान दिले.
या घटनेमुळे बेकायदेशीर शिकारीसाठी होणाऱ्या गोळीबाराचा धोका पुन्हा एकदा समोर आला असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)