
नवी दिल्ली, 10 जून (हिं.स.) : एनडीए सरकारला एक तप म्हणजे 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही तपपूर्ती हे एनडीएच्या सर्व घटकपक्षांचे सामूहिक यश असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. एनडीए सरकारच्या यशस्वी वाटचालीला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिल्लीत आयोजित एनडीएच्या बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते.
याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, आपल्या दीर्घ राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार आले, मात्र सलग सर्वाधिक काळ सेवा करणारा पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळेल असे त्यांनी कधीही कल्पना केली नव्हती. “चरैवेति, चरैवेति” या संस्कृत मंत्राचा उल्लेख करत त्यांनी देशाने सतत पुढे जात राहिले पाहिजे, देशाची सेवा करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
मागील १२ वर्षांत एनडीए सरकारने देशाला स्थिर आणि निर्णायक नेतृत्व दिले आहे. त्यांच्या मते, भारत आता विकासाच्या नव्या टप्प्यावर असून “विकसित भारत” या व्हिजनसाठी देश उत्साहाने पुढे जात आहे.
ते म्हणाले की, 2014 पूर्वी देशात अस्थिरता आणि निर्णय प्रक्रियेत मंद गती होती, मात्र आज सरकार परिणामकारक आणि जलद निर्णयांवर भर देत आहे. पूर्वी विकास हळूहळू होतो असे मानले जात होते, पण आता भारत वेगाने पुढे जात असल्याचे मोदींनी अधोरेखित केले.
आर्थिक वाढीचा उच्चांक
पंतप्रधानांनी भारताच्या आर्थिक कामगिरीचा उल्लेख करताना सांगितले की 2025-26 मध्ये विकासदर 7.7 टक्के आणि अलीकडील तिमाहीत 7.8 टक्के राहिला आहे. त्यामुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक ठरला आहे. त्यांनी सांगितले की सरकारच्या धोरणांमुळे 25 कोटींहून अधिक नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत. करप्रणाली सुलभ करून 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आल्यामुळे मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
मोदी यांनी ऊर्जा, खनिजे, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआ.), ड्रोन, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डेटा सेंटर्स यांसारख्या क्षेत्रांना देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. भारताने या सर्व क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी पूर्वीच्या सरकारांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना निर्णय प्रक्रियेतील मंद गती आणि भ्रष्टाचारावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी “हिंदू ग्रोथ रेट” या संकल्पनेचा उल्लेख करत ती देशाच्या क्षमतेला कमी लेखणारी विचारसरणी असल्याचे म्हटले.त्यांच्या मते, पूर्वीची व्यवस्था अपयश आणि अस्थिरतेने ग्रस्त होती, तर एनडीए सरकारने विकासाला नवी दिशा दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले की एनडीए सरकारचा 12 वर्षांचा प्रवास हा सामूहिक प्रयत्न, स्थिरता आणि विकासाचा परिणाम आहे. भारत आज आत्मविश्वासाने पुढे जात आहे आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी