सक्षम, समृद्ध आणि प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी संकल्प करा - सुनेत्रा पवार
- पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आवाहन- अजित दादांच्या आठवणींनी दाटले मन मुंबई , 10 जून (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमावरील
NCP 27th anniversary sunetra pawars shred special post  ajit pawar


- पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आवाहन- अजित दादांच्या आठवणींनी दाटले मन

मुंबई , 10 जून (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमावरील आपल्या संदेशातून पक्ष कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतानाच दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन केले. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेत अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी नव्या जोमाने कार्य करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पहिलाच वर्धापन दिन असल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आणि नेतृत्वामध्ये भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींनंतर पक्षाची दोन गटांत विभागणी झाली होती. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षासोबत महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन्ही गट स्वतंत्रपणे वर्धापन दिन साजरे करत होते. मात्र यावर्षी जानेवारी महिन्यात बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता.

आपल्या संदेशात सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच्या २७ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत पक्षाच्या यशामागे जनतेचा, कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की, यंदाचा वर्धापन दिन साजरा करताना मनात वेगळीच भावना दाटून येत आहे, कारण आज अजित दादा आपल्यात नाहीत.

अजित पवार यांचे स्मरण करताना त्यांनी म्हटले की, दादा हे केवळ पक्षाचे नेते नव्हते, तर हजारो कार्यकर्त्यांचे आधारवड होते. सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, संकटात धावून जाणारे, चूक झाली तर समजावून सांगणारे आणि चांगल्या कामाचे कौतुक करणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी जपलेला माणूस हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करत, पुरोगामी विचारांच्या बळावर अधिक प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande