
जळगाव, 10 जून, (हिं.स.) - जळगाव पोलिसांनी शहरातील अवैध धंद्यांवर एकाच दिवशी सहा ठिकाणी धाडी टाकत जुगार आणि दारूचे अड्डे जागेवरच जमीनदोस्त केले आहेत. या कारवाईत एकूण ४३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईने अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. अत्यंत गोपनीय पद्धतीने नियोजन करत या पथकाने शहर, एमआयडीसी आणि शिरसोली परिसरात एकाचवेळी कारवाई करत अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले.
बॉम्बे रेल्वे गेट परिसरातील पुलाखाली सुरू असलेल्या ‘मिलन डे ओपन’ सट्टा अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी घनश्याम राजाराम पाटील आणि मुकेश भिका मराठे यांच्यावर कारवाई केली. या ठिकाणाहून रोख रक्कम व साहित्य असा ९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एमआयडीसीतील पुष्पा पेट्रोलपंपाजवळ सुरू असलेल्या ‘टाईम बाजार’ सट्टा अड्ड्यावर छापा टाकून हनिफ सैय्यद नवाज आणि रविंद्र गंभीर पाटील यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत ७ हजार ८० रुपयांची रोकड व साहित्य जप्त करण्यात आले. आर.एल. चौफुली परिसरात सुरू असलेल्या सट्टा जुगारावरही पोलिसांनी कारवाई करत मदानंद शिंदे, शुभम जाधव आणि कैलास खेळवण यांच्याकडून ३ हजार ४९० रुपयांची रोकड व साहित्य जप्त केले.
शिरसोली गावात गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत आरोपी रवींद्र प्रकाश धनगर याच्याकडून १७ हजार १० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या ठिकाणचा सट्टा अड्डाही पोलिसांनी उद्ध्वस्त केला.सट्टा अड्ड्यांवरील कारवाईसोबतच एमआयडीसी परिसरातील पुष्पा पेट्रोलपंप आणि आर.एल. चौफुली परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यांवरही पोलिसांनी धाड टाकली. सुरेश भिमराव सपकाळे आणि विशाल पुनमचंद राठोड यांच्याकडून ६० लिटर गावठी दारू (किंमत ६ हजार रुपये) जप्त करण्यात आली. या दोन्ही ठिकाणचे अतिक्रमणही पोलिसांनी हटवत अड्डे जमीनदोस्त केले.डीवायएसपी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुरेश साळुंखे, आवेश आरिफ शेख आणि अमोल ठाकूर यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या फिर्यादीवरून संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या विशेष मोहिमेत सट्टा जुगारातील ३७ हजार ५० रुपये रोख रक्कम आणि ६ हजार रुपयांची ६० लिटर गावठी दारू असा एकूण ४३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अतिक्रमणासह अवैध धंद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली असून, जिल्ह्यात अवैध धंदे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत आणि पुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर