खलिस्तानच्या नावाने आयईडी हल्ल्याची धमकी; संघ मुख्यालयाची सुरक्षा कडक
नागपूर, 10 जून (हिं.स.) : नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयासह अनेक संवेदनशील ठिकाणांवर आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस) द्वारे हल्ला करण्याची धमकी देणारा ई-मेल बुधवारी प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या
हेडगेवार स्मृति मंदिर इमारत लोगो


नागपूर, 10 जून (हिं.स.) : नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयासह अनेक संवेदनशील ठिकाणांवर आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस) द्वारे हल्ला करण्याची धमकी देणारा ई-मेल बुधवारी प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या घटनेनंतर नागपूर आणि पुणे येथील संबंधित ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना वाढविण्यात आल्या आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ई-मेल ‘खलिस्तान’च्या नावाने पाठविण्यात आला होता. पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर हा संदेश प्राप्त झाला. ई-मेलमध्ये पुणे महापौर कार्यालय, नागपूरमधील काही महत्त्वाची ठिकाणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर आयईडी हल्ल्याची योजना असल्याचा दावा करण्यात आला होता.

धमकीची माहिती मिळताच यंत्रणांनी त्वरित कारवाई केली.

नागपूरच्या महाल परिसरातील संघ मुख्यालय तसेच रेशिमबाग येथील डॉ. हेडगेवार भवन परिसरात बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. सुमारे 2 तास चाललेल्या कसून तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक साहित्य आढळून आले नाही. ई-मेलमध्ये हल्ल्याची विशिष्ट तारीख अथवा वेळ नमूद करण्यात आलेली नसल्याने सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक, गुप्तचर विभाग आणि सायबर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त तपास सुरू केला आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरमधील संघाच्या मुख्यालयासह संवेदनशील सरकारी विभागांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली आहे. महत्त्वाच्या ठिकाणांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, सायबर गुन्हे तपास पथकाने ई-मेलचा उगम शोधण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला आहे. ई-मेल राउटिंग, डिजिटल फूटप्रिंट्स आणि इतर फॉरेन्सिक पुराव्यांचे विश्लेषण करून संदेश पाठवणाऱ्या व्यक्ती किंवा गटाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

धमकीच्या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व ठिकाणी युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र आतापर्यंत कोणतेही स्फोटक साधन, संशयास्पद वस्तू किंवा आक्षेपार्ह साहित्य आढळले नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

फॉरेन्सिक तपास आणि ई-मेलची सखोल पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील माहिती जाहीर करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने सांगितले. या घटनेमुळे निनावी ऑनलाइन धमक्यांचे वाढते आव्हान आणि संवेदनशील संस्थांमध्ये अधिक मजबूत सायबर सुरक्षा व देखरेखीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande