दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गजवळ अंधाधुंद गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, ९ जण जखमी
प्रिटोरिया, 10 जून (हिं.स.)। दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहराच्या पूर्वेकडील क्लीव्हलँड परिसरात झालेल्या भीषण गोळीबारात किमान १२ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण आफ्र
South Africa Shooting Near Johannesburg 12 Dead 9 Injured


प्रिटोरिया, 10 जून (हिं.स.)। दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहराच्या पूर्वेकडील क्लीव्हलँड परिसरात झालेल्या भीषण गोळीबारात किमान १२ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण आफ्रिका पोलीस सेवेनुसार, मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजून १० मिनिटांनी जंपर्स या अनौपचारिक वस्तीत गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना वस्तीतील विविध ठिकाणी अनेक पीडित आढळले.

गोळीबारात आठ पुरुष आणि तीन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहापेक्षा अधिक संशयितांना एका पांढऱ्या रंगाच्या टोयोटा क्वांटम वाहनातून क्लीव्हलँडमधील एका इंधन भरणा केंद्राजवळ उतरविण्यात आले होते. त्यानंतर हल्लेखोरांनी दोन वेगवेगळ्या मार्गांनी वस्तीत प्रवेश केला. त्यांनी परिसरात फिरत रहिवाशांवर अंधाधुंद गोळीबार केला आणि हल्ल्यानंतर पुन्हा त्याच वाहनातून घटनास्थळावरून पलायन केले.

या हल्ल्यामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. हा हल्ला कोणत्या कारणामुळे करण्यात आला, याबाबत पोलीस तपास सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. संशयितांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी कोणतीही माहिती असल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. या सामूहिक गोळीबाराने दक्षिण आफ्रिकेतील सुरक्षेच्या प्रश्नांबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande