बंगालचे माजी मंत्री उज्ज्वल बिस्वास यांना अटक; महुआ मोइत्रा यांचा भाजपवर आरोप
कोलकाता, 10 जून (हिं.स.)। पश्चिम बंगालमध्ये मदत साहित्य वितरणातील कथित अनियमितते प्रकरणी माजी मंत्री उज्ज्वल बिस्वास यांना दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांच्या निवासस्थानाबाहेर कथित मदत साहित्य घोटाळ्याच्या आरोपावरून मोठ्या प्रमा
WB TMC Ujjwal Biswas Arrested Mahua Moitra BJP


कोलकाता, 10 जून (हिं.स.)। पश्चिम बंगालमध्ये मदत साहित्य वितरणातील कथित अनियमितते प्रकरणी माजी मंत्री उज्ज्वल बिस्वास यांना दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांच्या निवासस्थानाबाहेर कथित मदत साहित्य घोटाळ्याच्या आरोपावरून मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त जमावाने त्यांच्यावर अंडीही फेकली. परिस्थिती बिघडताच पोलिसांनी त्यांना तेथून ताब्यात घेतले आणि चौकशीनंतर उशिरा रात्री अटक केली. त्यांना बुधवारी कृष्णनगर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

उज्ज्वल बिस्वास यांच्या अटकेनंतर राजकीय वादही तीव्र झाला आहे. कृष्णनगरच्या तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा खासदार महुआ मोइत्रा यांनी बुधवारी या कारवाईला पूर्णपणे राजकीय स्वरूपाचे असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षावर (भाजप) कट रचल्याचा आरोप केला.

महुआ मोइत्रा म्हणाल्या की, त्या स्वतःही आमदार राहिल्या आहेत आणि राज्यातील सर्व आमदारांना ईद किंवा इतर मोठ्या सणांच्या निमित्ताने वाटपासाठी कपडे तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीसाठी ताडपत्रीसारखे मदत साहित्य उपलब्ध करून दिले जाते. त्यांच्या मते, अनेक आमदार हे साहित्य आपल्या घरात किंवा गोदामात ठेवतात. त्यांनी दावा केला की, उज्ज्वल बिस्वास यांनीही हे साहित्य आपल्या घरी सुरक्षित ठेवले होते.

तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सांगितले की, ईदपूर्वी निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे या साहित्याचे वितरण होऊ शकले नव्हते. त्यामुळे ते साहित्य त्यांच्या घरातच ठेवण्यात आले होते. त्यांनी पुढे सांगितले की, राज्यातील सत्तांतरानंतर ४ जून रोजी एक प्रशासकीय आदेश जारी करण्यात आला होता. त्यामध्ये माजी आमदारांकडे असलेले सरकारी मदत साहित्य संबंधित उपविभागीय अधिकारी (एसडीओ) किंवा गटविकास अधिकारी (बीडीओ) यांच्या माध्यमातून परत सरकारी ताब्यात घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.

महुआ मोइत्रा यांच्या म्हणण्यानुसार, उज्ज्वल बिस्वास यांनीही प्रशासनाला पत्र लिहून त्यांच्या घरात ठेवलेले मदत साहित्य घेऊन जाण्याची विनंती केली होती. त्यांनी दावा केला की, ९ जून रोजी बीडीओ कार्यालयाकडून हे साहित्य घेण्यासाठी वाहन पाठविण्यात आले होते. त्याचवेळी भाजपचे काही कार्यकर्ते आणि समर्थक तेथे पोहोचले आणि त्यांनी कथितपणे तोडफोड केली. तसेच माजी मंत्र्यांशी धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.

महुआ मोइत्रा म्हणाल्या की, उज्ज्वल बिस्वास हे ज्येष्ठ राजकीय नेते आहेत आणि त्यांच्याविरोधातील कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली आहे. संपूर्ण घटनाक्रम हा भाजपाचा सुनियोजित कट असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande